Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुल होत नसल्याने पतीने केला पत्नीचा खून
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
5कराड/ओगलेवाडी,
दि. 19 : मुल होत नसल्याचा कारणावरून पती जालिंदर प्रताप वाघमारे याने केलेल्या जबर मारहाणीत पत्नी प्रतिभा उर्फ जयश्री वाघमारे (वय 32) हिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री बनवडी, ता. कराड येथे घडली. याची माहिती स्वतः जालिंदर वाघमारे याने कराड शहर पोलीस स्टेशनला रात्री हजर होऊन दिली. जालिंदर हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथचा जिल्हाध्यक्ष आहे.
बनवडी येथे मूळ गावात जालिंदर आणि पत्नी प्रतिभा हे स्वतःच्या घरात एका खोलीत विभक्त रहात होते. मयत प्रतिभा यांचे माहेर कराड तालुक्यातील हेळगाव असून तिचे 2005 मध्ये जालिंदरशी लग्न झाले होते. लग्नाला 14 वर्षे होऊनही त्यांना अपत्य नाही. त्यामुळे जालिंदर नैराश्येत असायचा. या कारणावरून या दोघांमध्ये सतत भांडणे होत होती.
मंगळवारी दुपारी जालिंदर वाघमारे हा दारू पिऊन घरी आला होता. यावेळी त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या जालिंदर वाघमारे याने तुला मुलं होत नाही, तू कुपोषित आहे, असे म्हणत पत्नी प्रतिभास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रतिभा जमिनीवर कोसळली. त्यानंतरही जालिंदरने तिच्या पोटावर, गळ्यावर, डोक्यावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी तिच्या कपाळावर एक जखम होवून त्यामधून रक्तस्त्राव झाला व तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती स्वतः जालिंदर याने पोलीस ठाण्यात दिली. त्यावेळी पोलीसही हादरले. त्यानंतर फौजफाट्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरू होते. पंचनामा झाल्यावर रात्री साडेबाराच्या सुमारास प्रतिभाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. कायदेशीर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, याबाबत प्रतिभा हिची मोठी बहीण राणी भंडारे यांनी कराड शहर  पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे आणि पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी. एम. मछले करीत आहेत.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: