Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आ. अजित पवार कोरेगावमधून निवडणूक लढवणार?
ऐक्य समूह
Saturday, August 03, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: lo1
बुधवारी रात्री सातार्‍यात खलबते
शशिकांत कणसे
5सातारा, दि. 2 : लोकसभा निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि कोरेगावचे राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांचे जुळलेले सूर पाहता सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांनाच निवडणुकीत उतरवण्याच्या निष्कर्षापर्यंत राष्ट्रवादी पक्ष आला असल्याचे समजते. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ कायम ठेवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान आ. अजित पवार यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरविण्याचे मनसुबे आखले जात असून तशी खलबते बुधवारी रात्री सातार्‍यात एका आमदाराच्या निवासस्थानी झाली असल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांचे मूळ गाव नांदवळ, ता. कोरेगाव हे असून जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना सध्या त्यांच्या ताब्यात असल्याने या वृत्ताला बळ मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाल्यामुळे त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी रात्री आमदारांना दिल्या. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात तोलामोलाचा उमेदवार देण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कोणताही दगाफटका होणार नाही, या दृष्टीने आमदारांसह प्रमुख पदाधिकार्‍यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. दोन वर्षांपूर्वी खा. श्री. छ. उदयनराजे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या सभेकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी निमंत्रण देऊनही पाठ फिरवली होती. ही बाब उदयनराजे यांच्या जिव्हारी लागली होती. सभा झाल्यानंतर साधारण सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात पक्षातील विरोधकांनीच एकसळ, ता. कोरेगाव येथे बैठक घेतली होती. या बैठकीला खा. श्री. छ. उदयनराजे यांनी नाट्यमयरीत्या उपस्थिती लावली होती. खा. श्री. छ. उदयनराजे यांनी दिलेल्या या झटक्यामुळे काळाची पावले ओळखून आ. शशिकांत शिंदे यांनी खा. उदयनराजे  यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांचा खा. उदयनराजे यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. मात्र, उदयनराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, यासाठी सुरुवातीपासूनच आ. शशिकांत शिंदे आघाडीवर होते. खा. शरद पवार यांनी खा. उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांच्या प्रचारात आघाडी घेतली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मताधिक्य मिळवून दिले. या कालावधीत खा. उदयनराजे आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चांगले सूर जमले. खा. उदयनराजे यांचे निकटवर्गीय आ. म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला हादरा दिला. चाणाक्ष शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीमधील एकही कार्यकर्ता आपल्या विरोधात जाणार नाही, याची काळजी घेतली होती. शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादी सोडणार नाहीत, या स्वप्नात रंगलेल्या राष्ट्रवादीनेही शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात तोलामोलाचा उमेदवार शोधला नाही. त्यामुळे आता सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे हेच शिवेंद्रसिंहराजे यांना कडवा विरोध करू शकतात, या निष्कर्षापर्यंत राष्ट्रवादी पक्ष आला आहे. सातारा-जावलीतून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास खा. उदयनराजे प्रचंड ताकदीने त्यांना निवडून आणतील, असा राष्ट्रवादीला आत्मविश्‍वास आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची झालेली पडझड पाहता भविष्यकाळात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचे संख्याबळ, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सातारा-जावली तालुक्यातील पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, सहकारी सेवा सोसायट्या यावर केवळ राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना दोनच दिवसांपूर्वी खा. शरद पवार यांनी आमदारांना केल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ झाला आहे. आ. शशिकांत शिंदे यांना सातारा-जावलीतून निवडणूक रिंगणात उतरवल्यास कोरेगावमधून प्रबळ उमेदवार कोण द्यायचा, यावर सध्या खल सुरू आहे.
मध्यंतरीच्या काळात पवार कुटुंबीयातील सदस्य रोहित पवार यांचे नाव कोरेगावमधून पुढे आले होते. हे नाव कोरेगावकरांसाठी नवीन असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये अजिबात नाही. रोहित पवार यांच्यापेक्षा माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान आ. अजित पवार यांना कोरेगावमधून विधानसभा निवडणुकीत उतरवले तर राष्ट्रवादीच्या आमदारांचे संख्याबळ कायम राहण्यास मदत होणार आहे. अजित पवार यांचे मूळ गाव नांदवळ हे असून त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा गट कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी त्यांच्याशी जोडला गेला आहे. आ. शशिकांत शिंदे यांना सातत्याने विरोध करणारा सुनील खत्री गट हा अजित पवारांचे नेतृत्व मानतो. या सर्व जमेच्या बाजू पाहता अजित पवार यांनाच कोरेगावमधून विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचे मनसुबे बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत बांधण्यात आले. कोरेगावच्या उमेदवारीवरून तब्बल तीन तास खल सुरू होता. कोरेगावमधून निवडणूक लढण्यासाठी आ. अजित पवार तयार होतील का, हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
 शिवसेनेचा उमेदवार कोण?
शिवसेना-भाजप युतीमध्ये यापूर्वी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. जागावाटपाचे सूत्र पूर्वीप्रमाणेच राहील, असे सांगण्यात येत असल्याने या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांची जन्मभूमी हा मतदारसंघ आहे. एकसळ, ता. कोरेगाव हे त्यांचे गाव आहे. सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये सतत प्रकाशझोतात असणारे रणजित भोसले हे अलीकडच्या काळात  पक्षापासून अलिप्त झालेत की काय अशी विचारणा होऊ लागली आहे. सध्या तरी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दत्ताजीराव बर्गे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले हे तिघे उमेदवारीबाबत दावा करू शकतात.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: