Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संगममाहुली येथे पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
ऐक्य समूह
Tuesday, August 06, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 5 : धोम आणि कण्हेर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा व वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या दोन नद्या संगममाहुली येथे एकत्र येत असल्यामुळे नदीला पूर आला असून पुराचे पाणी महादेव मंदिरात शिरले असून पाणी नदीपात्राबाहेर आल्यामुळे ते पाहण्यासाठी शहराच्या विविध भागातील नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे संगममाहुलीला यात्रेचे स्वरूप आले होते.
सातारा जिल्ह्यावर वरुण राजाने कृपादृष्टी केल्या-मुळे मुसळधार पाऊस होत आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. यावर्षी पावसाने थोडा उशीर केला असला तरी ही कसर भरून काढत जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच धरणातील पाणीसाठ्याचा कोटा त्याने पूर्ण केला होता. ऑगस्टमध्ये श्रावण सुरू होतो. त्यामुळे पाऊस आणि उन्हाचा लपंडाव सुरू असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून उत्तरेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे एकंदरीत अंदाज घेत धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचे योग्य नियोजन करून पूर परिस्थिती निर्माण होवून त्याचा जनजीवनावर परिणाम होऊ नये म्हणून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहेत. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून पाणी नदीपात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची हीच परिस्थिती राहिल्यास महापूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वेण्णा आणि कृष्णा नदीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे माहुली येथे कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून हे पाणी रहिवासी भागात शिरण्यास सुरुवात झाली आहे. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे संगम व क्षेत्रमाहुली येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होते. परंतु संगममाहुली येथील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असल्यामुळे भाविकांची निराशा झाली. याशिवाय पुराचे पाणी पहाण्यासाठी शहराच्या विविध भागातून नागरिक माहुली येथे गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे माहुलीला यात्रेचे स्वरूप आले आहे. वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मात्र पोलिसांची कुमक ठेवणे गरजेचे असताना केवळ कमानीजवळ पोलीस तैनात करण्यात आल्यामुळे पूर भागात युवक धोका पत्करून मंदिराच्या भिंतीवर चढून सेल्फी काढत आहेत. जरा जरी कोणाचा धक्का लागल्यास जीव जाण्याची भीती संभवते. या ठिकाणी पोलीस तैनात करणे आवश्यक आहे.
 वाहतुकीचा बोजवारा
पूर पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांची वाहने स्वागत कमानीच्या जवळच अडवली जात आहेत. केवळ स्थानिकांनाच जाण्यास मुभा दिली जात असल्यामुळे पूर पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला वेडीवाकडी वाहने लावली जात असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याशिवाय पुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडत आहेत. हा पूल 100 वर्षांपूर्वीचा असल्यामुळे जड वाहने पुलावर अडकून पडल्यास धोका होण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांची या ठिकाणी नेमणूक करून वाहतुकीची कोंडी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: