Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नावडी गाव व हनुमान मंदिर परिसरात पुराचे थैमान
ऐक्य समूह
Wednesday, August 07, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: re3
निसरे-नावडी पूल पाण्याखाली
5मल्हारपेठ, दि. 6 ः दहा वर्षातला हा मोठा मुसळधार पाऊस, गारठा भरणारा वारा व पावसाने हाहाकार माजवला आहे.  वेगाने वाढणार्‍या कोयनेच्या महापुराच्या पाण्याने निसरे-नावडी पूल पाण्याखाली गेला आहे.
नवारस्ता, निसरे, नावडी, मंद्रुळहवेली, जमदाडवाडी या गावात पाणी शिरले आहे. नावडी हनुमान मंदिरात पाणी घुसले आहे. नावडी, वेताळवाडी रस्त्यावर पाणी आले आहे. पहाटेपासून निसरे-मारुल हवेली मार्ग बंद झाला आहे. एस. टी. सेवा, दूध वाहतूक सेवा बंद पडली आहे. प्रशासनाची कुमक कुचकामी ठरली आहे. आरोग्य सेवा, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा गायब झाले आहे. रस्त्यांची चाळण झाली तर घरे पडझडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या 10 दिवसात कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने नदी पात्रात पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. निसरे नवीन पूल बुडला आहे. अजूनही मोठ्या पावसाची शक्यता वाढली आहे. कोयना धरणाकडे लक्ष लागले आहे. कोयना नदीकडेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. नदीपात्रातील पाणीपातळी वाढली आहे. पाण्याखाली गेलेला निसरे पूल पाहण्यासाठी व पाणी पूजन व ओटी भरण्यासाठी भागातील महिला व लोकांची झुंबड उडाली आहे. निसरे-नावडी पूल बुडण्याच्या मार्गावर आहे. हे पाणी नावडी मंद्रुळहवेली, सांगवड, पापर्डे गावात व शेत-शिवारात शिरले आहे. नदीकाठच्या गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच गावागावात जुन्या घरांची पडझड सुरू आहे.  पावसाळी आजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
याच वेळी आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही काम दिसून येत नाही.
पूररेषेने पाणी पातळी ओलांडली असल्याने लोकांची भयभीत अवस्था झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: