Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दरवाजे साडेचौदा फुटांवर
ऐक्य समूह
Thursday, August 08, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: re2
पाटण तालुक्यात पूर परिस्थिती जैसे थे....
91 हजार आवक : 103 टीमसी पाणीसाठा
5पाटण, दि. 7 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याने कोयना जलाशयात येणार्‍या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे 16 फुटांवर उचलण्यात आलेले कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे बुधवारी सकाळी 11 वाजता 2 फुटाने कमी करून 14 फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र, पाटणसह कोयना नदी काठावरील पूर परिस्थिती जैसे थे असून अद्यापही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. बुधवारी पाटणमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने रेस्क्यू करत जमदाडवाडी, त्रिपुडीसह अनेक गावांत अडकलेल्या लोकांना पुरातून बाहेर काढले. तर आतापर्यंत तालुक्यातील दीड हजारपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, धरणातील पाण्याची आवक पाहता दरवाजे कमी-जास्त केले जातील, अशी माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे. 
गेल्या पंधरा दिवसांपासून सलग कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरू असल्याने कोयना धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे धरणात येणारे अतिरिक्त पाणी सोडून दिल्याशिवाय व्यवस्थानला पर्याय नव्हता. मंगळवारी 4 वाजता कोयना धरणाचे दरवाजे 16 फूट उचलून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणात येणार्‍या पाण्याची आवक 91 हजार क्युसेक्सपर्यंत कमी झाली. त्यामुळे बुधवारी  सकाळी कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटाने कमी करून 14 फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत. पाटण शहरासह तालुक्याच्या विविध भागात रस्ते खचले आहेत, दरडी कोसळण्याचे प्रकार होत आहेत.  घरात पाणी शिरल्याने अनेक घरांच्या पडझडी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना जीवनावश्यक असणार्‍या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. संपूर्ण तालुक्यातील शहराला दूध पुरवठा केला जातो तो सोमवारपासून पाटण शहराला मिळाला नाही. त्याबरोबर शहरासाठी लागणारा भाजीपाला देखील वाहतूक बंद असल्याने आला नाही. पाटण तालुक्यात कोयना नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पाटण शहराबरोबर हेळवाक, येराड, मारूल, नावडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती  निर्माण झाली आहे. पांढरेपाणी गावातील रामचंद्र केसू शेळके यांच्या रानात चारावयास नेलेल्या  म्हशीपैकी गोळनाचा ओढ्यातून दोन म्हशी वाहून गेल्या. तारळे विभागातील पाबळवाडी गावालगत संपूर्ण रस्ता जवळपास पाच ते सहा फूट खोल व दोनशे ते तीनशे फूट लांब खचल्याने पाबळवाडी-तारळे संपर्कहीन झाले आहेत. गावातील हणमंत ज्ञानू पाबळ यांचे  घर दरीत कोसळले आहे. म्हारवंड येथे पडणार्‍या मुसळधार पावसाने अति बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.  मोठा ओढा गावाकडे वळला असून भूस्खलनशील  मलब्यामुळे पाण्याने दिशा बदलून 50 ते 60 फूट रस्ता खचला असून खोल दरड पाडून 4 ते 5 एकर भातशेती शिवारात माती आणि दगड मलबा बसला आहे. शिवारात पडलेल्या भेगा अधिक रुंदावल्या असून भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणच्या लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पाटण शहरातील जुने बसस्थानक परिसरातील रुपेश माने व सिध्दार्थनगर येथील पांडुरंग भिसे, सुनील भिसे यांच्या घराची मोठी पडझड झाली आहे. पाटण शहरातील झेंडा चौक ते नवीन बस्थानक परिसर, स्मशानभूमी, कळके चाळ परिसर गेल्या चार दिवसांपासून पाण्या खाली आहे. येथील 400 ते 500 नागरिकांना साळुंखे हायस्कूलमध्ये आणि मार्केट यार्ड परिसरात स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथील पूरग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. या ठिकाणी पाटण येथील मुस्लीम समाज,  सामाजिक कार्यकर्ते नितिन पिसाळ मित्र परिवारातर्फे नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून कराड-चिपळूण हा राष्ट्रीय महामार्ग बंद असून  हेळवाक, पाटण, म्हावशी, येरफळेसह ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने कोयना, चिपळूण, गुहाघर, रत्नागिरी, दापोली मार्ग पूर्णत: बंद आहे. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राचा संपर्क चार दिवसांपासून तुटलेलाच आहे. तर पाटण तालुक्यातील मेंढेघर, सांगवड, संगमनगर (धक्का), नेरळे, मूळगाव, निसरे आदींसह छोटे, मोठे पूल अद्यापही पाण्याखाली असल्याने जवळ जवळ अर्ध्यापेक्षा जास्त पाटण तालुका संपर्कहीन झाल्याने पाटण तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोयना धरणाचे दरवाजे 22 फुटांवर आणि इमर्जन्सी गेटमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्याने प्रशासनाकडून अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पूरग्रस्तांच्या छावणीत प्रांताधिकार्‍यांचे जेवण
गेल्या चार दिवसांपासून पाटण तालुक्याच्या विविध विभागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व घटनांवर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि तहसीलदार रामहरी भोसले यांच्यासह महसूल विभाग लक्ष ठेवून आहे. पाटणमध्ये हायस्कूलमध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या लोकांबरोबरच बुधवारी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी जेवण घेतल्याने पूरग्रस्त जनतेलाही दिलासा मिळाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: