Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
ऐक्य समूह
Friday, August 09, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo2
11 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
5सातारा, दि. 8 : म्हावशी, ता. खंडाळा येथील ब्राह्मण मळा नावाच्या शिवारात वराह पालन शेडवर धाडसी दरोडा टाकून एकाला मारहाण करून 7 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणार्‍या सात जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात खंडाळा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 1 मार्च 2019 रोजी रात्री 1.15 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास म्हावशी, ता. खंडाळा येथील ब्राह्मण मळा नावाच्या शहरात असणार्‍या वराह पालन शेडमध्ये दोन पिकअप आणि एक दुचाकीवरून आलेल्या 7 जणांच्या टोळीने घुसून झोपलेल्या एकाला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून 1 लाख रुपये रोख  आणि 54 वराह असा एकूण 7 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. संबंधिताने याबाबतची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात सात जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना तपास अधिकारी हणमंत गायकवाड यांना दिल्या होत्या. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले होते. विजय कुंभार आणि हणमंत गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित प्रकाश अशोक जाधव (वय 24), रा. तानाजी चौक, शिरवळ, ता. खंडाळा याला अटक करून विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे सहकारी विलास श्रीपती माने, रा. केळेवाडी, चांदणी चौक, ता. हवेली सध्या रा. चिंबळे, ता. श्रीगोंदा, महादेव तानाजी जाधव, रा. दापोडी, ता. दौंड, विजय संजय साळुंखे, रा. मांडकी, ता. पुरंदर, केशव कैलास जाधव, रा. टाकळी, ता. पुरंदर, नागेश्‍वर बाळासाहेब जाधव, श्रीकांत आनंदराव दानवले, दोघेही रा. मांडकी, ता. पुरंदर यांनी दरोडा टाकल्याची कबुली दिली. या सर्व संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना मिळालेल्या पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिकअप, एक दुचाकी, 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 40 वराह असा एकूण 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार नितीन नलावडे, पोलीस नाईक सचिन वीर, प्रशांत धुमाळ, गिरीश भोईटे, पोलीस शिपाई बालाजी वडगावे, शिवशंकर तोटेवाड व  विठ्ठल पवार यांनी सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: