Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
समझोता एक्स्प्रेसही बंद
ऐक्य समूह
Friday, August 09, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na1
5जम्मू, दि. 8 (वृत्तसंस्था) :  जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
पाकिस्तान दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले असून पाकिस्तानी उच्चायुक्तही भारतात रुजू होणार नाहीत.
समझोता एक्स्प्रेस चालू होऊन आज 40 पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत. 22 जुलै 1976 रोजी समझोता एक्स्प्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या 42 किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्स्प्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. 80 च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्स्प्रेस बंद केली होती. आता ही ट्रेन अटारीपर्यंत जाते. जेव्हा ही ट्रेन सुरु झाली तेव्हा दररोज या ट्रेनच्या फेर्‍या व्हायच्या. 1994 पासून या ट्रेनच्या साप्ताहिक फेर्‍या सुरु झाल्या. पाकिस्तानात लाहोर आणि भारतात दिल्लीमध्ये या ट्रेनचा थांबा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केल्यानंतर 2002 ते 2004 अशी दोन वर्षं समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. समझोता एक्स्प्रेसला अनेकदा राजकारणासाठीही लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे अनेकदा ही ट्रेन बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी 2007 रोजी पानिपतमधील दिवाना स्टेशनजवळ समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 68 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त होती. स्वामी असीमानंद यांच्यावर या स्फोटासाठी कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. समझोता एक्स्प्रेसच्या नियमित प्रवाशांसाठी पाकिस्तान सासर तर भारत माहेर अशी भावना आहे. थार एक्स्प्रेस सुरु होण्याआधी समझोता एक्स्प्रेसच भारत-पाकिस्तानला जोडणारे एकमेव रेल्वे कनेक्शन होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: