Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पूर पाहणीवेळी मंत्री महाजन सेल्फी काढण्यात गुंग
ऐक्य समूह
Saturday, August 10, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: mn3
5कोल्हापूर/सांगली, दि. 9 (प्रतिनिधी) : कोल्हापूर, सांगली, सातारासह पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांवर महापुराचे महासंकट ओढावले आहे. नौदल, लष्कर आणि एनडीआरएफसह पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी स्वतःला बचावकार्यात झोकून दिले आहे. असे असताना कोल्हापुरात बचाव पथकासोबत पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेले मंत्री गिरीश महाजन पूरस्थितीतही बोटीत बसून सेल्फी काढण्यात गुंग असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे पुराचा फटका बसला आहे. घरांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नौदल, लष्कर आणि एनडीआरएफसह          पोलीस विभागातील कर्मचारी-अधिकारीही दिवस-रात्र कार्यरत आहेत. अशा वेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव पथकासोबत गेलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सेल्फी काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.    
कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कार्यकर्त्याने हा व्हिडिओ काढला आहे. बचाव पथकाच्या बोटीमध्ये महाजनांसोबत हा कार्यकर्ताही होता, असे सांगितले जाते. पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कार्यकर्ता मोबाइलद्वारे चित्रण करत होता. पण महाजन यांनी त्याला रोखले नाही. या व्हिडिओत महाजनही  ‘हसताना’ दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटकर्‍यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
सांगलीत महाजनांना पूरग्रस्तांचा घेराव
सांगलीलाही पुराचा वेढा आहे. राज्याचे मंत्री महाजन हे पूरग्रस्त सांगलीवाडीत आज पोहोचले. तेथील परिस्थितीचा आणि मदतकार्याचा आढावा घेतला. मदत पोहोचली नसल्याने पूरग्रस्तांनी संताप व्यक्त करत महाजन यांना घेराव घातला. आम्हाला मदत कधी मिळणार, असा जाब त्यांनी महाजन यांना विचारला. सर्वांपर्यंत मदत पोहोचवण्यास प्राधान्य दिले जात आहे. सर्वांना मदत देण्याचे प्रयत्न आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. पुरातून बाहेर काढलेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही खबरदारी घेतली जात आहे. रोगराई पसरू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. औषधं, डॉक्टरांच्या पथकांना पाचारण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सेल्फी व्हिडिओवर स्पष्टीकरण
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक जण सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतात. किती जणांना थांबवणार, असा प्रश्‍न पडतो. सेल्फी व्हिडिओ काढताना मी हात पुढे करून थांबवण्याचा प्रयत्नही केला. आम्ही येथे मदतीसाठी आलो आहोत. पूरग्रस्तांना मदत देण्यास आमचे प्राधान्य आहे. उगाच कुणीही कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करू नये. सांगलीतील शेवटच्या माणसाला पुरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ट्रोलिंग करुन झाले असेल तर मदतकार्याला या!
 मदतकार्याचे राजकारण करणार्‍या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो, की आपल्या घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ट्विटवरुन केले आहे. महाजन यांचा कोल्हापूर-सांगलीच्या पूर पाहणी दौर्‍यातील सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या व्हिडिओत महाजन हसत हात हलवताना दिसत असल्याने नेत्यांमधील संवेदनशीलता हरवल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र आता महाजन यांनी या टिकेला ट्विटवरुन उत्तर दिले आहे.
विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना महाजन यांनी स्वत: एनडीआरएफ जवानांसोबत पाण्यात उतरुन लोकांना बाहेर काढण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे. गेल्या चार दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावात आज पोहोचलो, असे महाजन यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे. 
महाजन यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाजनांवर टीका केली होती.
                   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: