Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आगाशिवनगर येथे जावयाकडून मेव्हण्याचा निर्घृण खून
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 11 ः सासू व मेव्हण्यावर असलेल्या रागातून जावयाने मेव्हण्याचा निर्घृण खून केल्याची घटना आगाशिवनगर, ता. कराड येथील दांगटवस्तीत शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सासू अनिता मुकेश पवार (वय 49), रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी जावई सागर शंकर जाधव (रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, ता. कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रणजित उर्फ निरंजन मुकेश पवार (वय 7) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अनिता पवार यांची मुलगी सोनाली हिचा 2010 मध्ये सागर जाधव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. सोनाली व सागर हे दोघेही अनिता पवार यांच्या घराजवळ दांगटवस्ती येथे वास्तव्यास होते. सागर जाधव यास दारूचे व्यसन आहे. सोनालीसोबत केलेल्या प्रेमविवाहास अनिता पवार यांचा विरोध होता. 2010 मध्ये अनिता पवार व जावई सागर जाधव यांच्यात भांडणे झाली होती. त्यावेळी सागरने सासू अनिता पवार यांच्या हातावर कोयत्याने वार केले होते. तेव्हा अनिता पवार यांनी जावयाच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. तेव्हापासून सागर हा सासूवर चिडून होता. सागर याने पत्नी सोनालीजवळ तुझ्या आईला, बापाला व रणज्याला वडापावमधून विषारी औषध देणार असल्याचे सांगितले होते. ही बाब सोनालीने आपल्या आईस सांगितली होती. चिडलेल्या जावयाने सासूला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. शनिवार, दि.10 रोजी सायंकाळी 5 वाजता रणजित हा सोनालीच्या मुलासोबत त्यांच्या घराच्या दारात खेळत होता. त्यावेळी आईने रणजित यास घरी बोलवले परंतु तो खेळत असल्याने आला नाही. त्यानंतर 7 च्या सुमारास अनिता पवार या रणजितला बोलावण्यास गेल्या असता तो तेथे आढळला नाही.  त्यामुळे त्यांनी जावयास रणजितबाबत विचारणा केली असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी मुलाचा आजूबाजूला शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. रात्री 9.30 वाजता मुलगी सोनाली कामावरून घरी आल्यानंतर रणजित सापडत नसल्याचे आईने सांगितले असता ती सुद्धा रणजितला शोधण्यासाठी मदत करू लागली. त्या दरम्यान जावई सागर याने सासूस  रणजित पाठीमागे भिंतीकडे लपून बसला आहे का ते बघून येतो, असे सांगितल.  तो आणि त्याचे सासरे तेथे गेले असता रणजित  जखमी अवस्थेत आढळून आला. रणजितच्या कपाळावर, चेहर्‍यावर, भुवई, कान व गालावर जखमा होत्या. त्याच अवस्थेत त्याला तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचे सांगितले. याबाबत जावई सागर जाधव याने रणजितचा खून केला असल्याचा संशय सासूने व्यक्त केला. याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली असून जावई सागर जाधव याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी भेट दिली असून पोलीस तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: