Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुणे-बंगलोर महामार्ग आजपासून सुरू होणार?
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: mn2
5कोल्हापूर, दि. 11 (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी सहाव्या दिवशीही ठप्पच होती. आज दुपारी पहिला टँकर सोडल्याने लोकांमध्ये महामार्ग सुरू झाल्याचे वृत्त पसरले. यामुळे अडकलेल्या लोकांनी वाहनांसह महामार्गाच्या दिशेने कूच केली होती. यामुळे पोलीस अधीक्षकांना याबाबत खुलासा करावा लागला असून महामार्गावरील पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे.
महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नाही. अत्यावश्यक सेवा बोटीतूनच पुरवण्यात येणार आहेत. केवळ इंधनाचे टँकर आणि रूग्णवाहिकांनाच महामार्गावरून वाट करून दिली जाणार आहे. महामार्गावर अद्याप पाणी असून ते ओसरल्यानंतरच म्हणजेच उद्या, सोमवारपासून महामार्ग खुला करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन सहावा दिवस उजाडला. रस्त्यावरून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. काल रात्रीपासून आज सकाळी दहापर्यंत पाण्याची पातळी  अर्धा ते पाऊण फुटाने कमी झाली आहे. अद्याप तीन ते साडेतीन फूट पाणी महामार्गावर आहे. तसेच पाण्याचा वेगही मोठा आहे. महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी पाण्याचा टँकर पोकलॅनसह पाठवून घेतली. टँकर पाण्याचा रस्ता पार करून गेला; मात्र पाण्याला वेग असल्यामुळे वाहतूक सुरक्षित नसल्याचे जाणवल्यामुळे महामार्गावरून अवजड वाहतूकही होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधूनच केला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पुराचे पाणी असून अनेक ठिकाणी महामार्ग बंद आहे. त्यामुळे बंगलोरकडे जाण्यासाठी सोलापूर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. देशमुख यांनी केले. सांगली फाटा येथे महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहनांची घेतलेली चाचणी अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंदच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: