Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महापुरात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू, दोन बेपत्ता
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: mn6
5पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
पुरामुळे सांगलीत 19, कोल्हापुरात 6, सातारा-पुण्यात प्रत्येकी 7 आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि सातार्‍यात प्रत्येकी एक अशा तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच ब्रह्मणाळमध्ये आज 5 मृतदेह सापडल्याचे दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. कोल्हापुरात 2 लाख 45 हजार 229 जणांचे तर सांगलीत 4 लाख 41 हजार 845 जणांचे स्थलांतर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी 56 फुटांवरून 53 फुटांवर आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूरग्रस्त कुटुंबांना रक्कम देताना बँकेकडून धनादेश किंवा बँक पासबुक मागण्यात येणार नाही. केवळ बँकेतील स्लीपवरून पैसे मिळणार आहेत. आधार कार्डवरून ओळख पटवली जाईल. एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास संबंधित पूरग्रस्त कुटुंबात या ओळखीच्या व्यक्तीचे आधार कार्ड पाहून रक्कम दिली जाणार असल्याचे म्हैसेकर म्हणाले. 
जणांचा मृत्यू, दोन बेपत्ता
48 तासात पाणी ओसरण्याचा अंदाज
येत्या 48 तासांमध्ये पाणी ओसरेल असा अंदाज आहे. पाणी ओसरल्यानंतर झालेला कचरा साफ करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पथक दोन्ही जिल्ह्यांमध्ये रवाना झाले आहेत. या शिवाय साफसफाईसाठी स्वतंत्र टेंडर काढून ही कामे ताबडतोब हाती घेण्यात येणार आहेत.
जनावरे दगावली
या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातार्‍यात एकूण 50 गाई, 42 म्हशी, 23 वासरे, 58 शेळ्या, 11 हजार 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून एकूण 25 लाख 17 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेल्पलाइन नंबर
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरसाठी हेल्पलाइन क्रमांक 7875769103 व सांगली जिल्ह्यासाठी 7875769449 हा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे.
रस्ते बंद
सांगली जिल्ह्यामध्ये 29 प्रमुख राज्यमार्ग, 38 प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण 67 रस्ते आणि 37 पूल बंद ठेवण्यात आले आहेत. तर कोल्हापूरमध्ये 29 राज्यमार्ग आणि 58 प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण 87 रस्ते आणि 37 पूल पाण्याखाली असल्याने बंद ठेवण्यात आल्याचे म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पाणशेत घोळ रस्ता (प्रमुख जिल्हा मार्ग क्र.141) दरड कोसळल्यामुळे बंद आहे. खेड तालुक्यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता शिरगाव-मंदोशी-तळेघर राज्यमार्ग क्र. 113 खचल्यामुळे बंद आहे व भोर तालुक्यातील वरंधा घाटरस्ता बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ प्रमुख राज्यमार्ग क्र. 15 ही खचल्यामुळे बंद आहे. सांगलीत एकूण 51 बचाव पथके, 95 बोटी 269 जवान कार्यरत आहेत. कोल्हापुरात एकूण 53 बचाव पथके, 87 बोटी 501 जवान कार्यरत आहेत. सांगली 80, कोल्हापूरमध्ये 150 आणि सातार्‍यात 72 अशी एकूण 302 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पूरग्रस्त प्रतिकुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत पुरविण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ डेअरी मार्फत 24 तास मोफत दूध पुरवठा करण्यात येत आहे. पाचही जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने 3 लाख 29 हजार 603 ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: