Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक सुरू
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: mn1
कोल्हापूर, सातार्‍यात अतिवृष्टीचा इशारा
5कोल्हापूर, दि. 12 (प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर आठ दिवसानंतर सोमवारी सकाळी सहापासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शिरोलीतून          कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी फक्त अवजड वाहतुकीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी असल्यामुळे कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती. महामार्गाची पाहणी करून ही वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. रविवारी दुपारी पहिला टँकर सोडल्याने लोकांमध्ये महामार्ग सुरू झाल्याचे वृत्त पसरले. यामुळे अडकलेल्या लोकांनी वाहनांसह महामार्गाच्या दिशेने कूच केली होती. परिणामी पोलीस अधीक्षकांना याबाबत खुलासा करावा लागला होता.
कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार, दि. 5 ऑगस्ट रोजी महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आठ दिवस या महामार्गावर पाणी असल्याने दोन्ही बाजूस पंचवीस हजारांहून अधिक वाहने अडकून पडली होती. या वाहनधारकांची कोल्हापूरमधील आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी जेवणाची व्यवस्था केली होती. आठ दिवसांनी ही वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.
पूरग्रस्तांसाठी 32 ट्रक जीवनावश्यक वस्तू रवाना
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत 32 ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आल्या आहेत. उपायुक्त नीलिमा धायगुडे यांच्या देखरेखीखाली मदत केंद्राचे कामकाज सुरू असून विविध संस्था,  संघटना व दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेतली व पूरग्रस्त सहाय्य मदत केंद्राला भेट दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना आवश्यकता असणार्‍या वस्तूंची यादी दिली. यावेळी त्यांच्या समवेत सिने अभिनेते विनोद खेडेकर, अश्‍विनी तेरणेकर होते.
आपले बांधव पुरामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वांनी मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना हृदय हेलावून टाकणारी असल्याची भावना सुबोध भावे यांनी व्यक्त केली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुराचे पाणी ओसरत आहे. या पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत, वस्तू व सेवा-सुविधा गतीने पोहोचविणे आवश्यक आहे. यापुढे मदत पोहोचविण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरविणे तसेच साफ-सफाईवर भर देणे गरजेचे आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने या भागातील साफ-सफाईची कामे करून कचरा हटवून निर्जंतुकींची कामे गतीने करावीत. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी. वीज पुरवठा खंडित असणार्‍या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा. पुराचे पाणी ओसरलेल्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू कराव्यात. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक सेवा-सुविधा गतीने पोहोचविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी उपायुक्त प्रताप पाटील, संजयसिंह चव्हाण, दीपक नलावडे, नीलिमा धायगुडे, चंद्रकांत गुडेवार, जयंत पिंपळगावकर, महा ऊर्जाचे प्रादेशिक संचालक महेश आव्हाड, नगरपालिका प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते.
पूरबळींची संख्या 43 वर, कोल्हापूर, सातार्‍यात अतिवृष्टीचा इशारा
कोल्हापूर आणि सांगलीत आज आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43 वर पोहोचली असून अद्यापही 3 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती देतानाच कोल्हापूर आणि सातार्‍यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीची माहिती दिली. सांगलीत काल रात्री 2 तर कोल्हापुरात एक मृतदेह सापडला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पुरात बेपत्ता झालेल्या तिघांचा अद्यापही शोध लागलेला नाही. आतापर्यंत 4, 74,226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितलं.
अतिवृष्टीचा इशारा, पण पाऊस सुरू नाही
कोल्हापूर आणि सातार्‍यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मात्र अद्याप या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच पाच हजार मिळणार
पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रोख रक्कम उद्या (दि. 13 रोजी) पूरग्रस्तांपर्यंत पोहोचणार असून 313 एटीएम सेंटरमध्ये पैसै भरण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: