Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडींवर आमचे बारीक लक्ष : चीन
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: na1
5बीजिंग, दि. 12 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सोमवारपासून द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा सुरू झाली आहे. भेटीदरम्यान जम्मू-काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर आपले लक्ष असल्याचे चीनने सांगितले. द्विपक्षीय मतभेद वादामध्ये बदलू नयेत या आपल्या भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे.
भारत-चीन संबंधांचे जागतिक राजकारणात एक वेगळे स्थान आहे. दोन्ही देश परस्परांच्या काळजीच्या मुद्यांवर पूर्णपणे संवेदनशील आहेत, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वॅँग यी यांना सांगितले. गेल्या वर्षी झालेल्या वुहान परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये मोकळेपणाने अनेक विषयांवर आदान-प्रदान झाले. अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्या परिषदेचा आज आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये परिणाम दिसून येत आहे, असे जयशंकर म्हणाले.
चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी भारत-पाकिस्तान तणावाचा उल्लेख केला. भारताने प्रदेशात शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावावी,   असे वँग म्हणाले. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचा विषय येतो त्यावेळी त्यावर आमचे बारीक लक्ष असते. प्रादेशिक शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यापूर्वी जयशंकर यांचा दोन दिवसांचा चीन दौरा निश्‍चित झाला होता. जयशंकर यांच्या दौर्‍यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी चीन दौर्‍यावर गेले होते. त्यांनी काश्मीर मुद्द्यावर चीनने पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे.
लडाखच्या निर्णयावर चीनचा आक्षेप
मागच्या आठवड्यात लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यावर चीनने आक्षेप घेतला होता. लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे चीनने म्हटले आहे. पाकिस्तान चीनचा रणनितीक आणि आर्थिक भागीदार आहे. चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरून काही वाद आहेत. त्यात अक्साई चीनचा भाग हा लडाखमध्ये येतो. त्यामुळे चीनने लडाखला केंद्रशासित प्रदेश मान्य करण्यास नकार दिला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: