Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण तालुक्यातील वीज पुरवठा पूर्ववत करा ः ना. शिवतारे
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 13 ः अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तत्काळ करावे, पाटण तालुक्यातील 47 गावांमध्ये वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करावी तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजना पुरामुळे नादुरुस्त झाली आहे. त्या दुरुस्त करून अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्याचे काम करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पाटण येथील पूरग्रस्त् बाधित झालेल्या भागांची पहाणी केली. त्यानंतर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. शंभुराज देसाई, आ. सुनील प्रभू, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, हिम्मत खराडे, तहसीलदार रामहरी भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शाळांचे नुकसान झाले आहे. या शाळांची तपासणी करून नुकसानीचा अहवाल शिक्षण विभागाने सादर करावा. नदीवरील उपसा सिंचन योजना सहकारी तत्त्वावर सुद्धा चालविल्या जातात. या उपसा सिंचन योजना अतिवृष्टीमुळे आता बंद पडल्या आहेत. या योजना सुरू करण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता आहे. या योजना मदत व पुनर्वसन योजनेंतर्गत बसविण्यासाठी तसा प्रस्ताव द्यावा. पाटण तालुक्यातील 47 गावांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मनुष्यबळ जर कमी पडत असेल तर इतर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग करावेत. पाटण तालुक्यातील 9 गावांचे भूस्खलन झाले आहे. तेथील नागरिकांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात यावी. तसेच त्यांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. पुरामुळे लोकांचे पशुधन पाण्यात वाहून गेले आहे. पशुसंवर्धन विभागांनी वरिष्ठांशी चर्चा करून या पशुपालकांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत. त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करावा. शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे.
पाटण शहराचा डीपी प्लॅन करण्याचे काम सुरू आहे. पाटण शहराला वारंवार पूर परिस्थिती निर्माण होते. ती पूरपरिस्थिती का निर्माण होते, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी व त्यांच्याकडून तसा अहवाल घ्यावा. या कामासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल तसेच पाटण शहरात ओढ्या, नाल्यांवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत त्यांना तत्काळ नोटिसा द्या अशा सूचनाही त्यांनी केल्या. आ. देसाई म्हणाले, पुरामुळे पशुधन वाहून गेले आहे. त्यांना पशुसंवर्धन विभागाने योग्य ती मदत करावी. अतिवृष्टीमुळे शाळांनाही फटका बसला आहे. ज्या शाळांच्या खोल्या धोकादायक आहेत अशा खोल्यांमध्ये शाळा भरवू नयेत. पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या खर्चाचा अहवाल तत्काळ सादर करावा. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची पहाणी करताना लोकप्रतिनिधींनाही सोबत घ्यावे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: