Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात लगबग
ऐक्य समूह
Saturday, August 31, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 30 ः गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागताच्या तयारीला गणेश भक्त लागले असून उत्सवाची तयारीही जोरदार सुरू आहे. विविध साहित्यामुळे बाजारपेठेत झगमगाट दिसू लागला आहे. सातार्‍याच्या बाजारपेठेत सजावट साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.
सजावटीच्या साहित्यात दारात या वर्षी 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. खरेदीसाठी नागरिकांची आतापासूनच गर्दी वाढत आहे. वेगवेगळ्या मखरांनी व सजावटीच्या फुलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. थर्माकोलच्या जागी कपड्यांचे मंडप, फुलांच्या माळा, चीन फुले, मण्यांच्या माळा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येथील कुंभारवाड्यात गणपती व गौरींच्या मुखवट्यावरून शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली. गणपती बाप्पाच्या वस्त्र व अलंकारांना खर्‍या खड्यांची सजावट केलेली दिसत आहे.
 लुकलुकणार्‍या विद्युत दिव्यांच्या माळा, कलात्मक पंख, फुले, विविध प्रकारच्या माळा, तोरणे, सजावटीच्या शेकडो वस्तूंबरोबरच आकर्षक कागदी वस्तू व विविध प्रकारच्या माळा विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याची नगा मागे 10 ते 15 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चायना प्रकारातील साहित्याला जास्त मागणी आहे. 50 रुपयांपासून पुढे त्यांच्या किंमती आहेत. त्यांच्या किमती 10 ते 15 टक्के वाढल्या आहेत.
गौराईसाठी मुखवट्यांबरोबरच वेगवेगळे दागिने व तयार साड्या बाजारात उपलब्ध आहेत. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मिठाईची दुकाने सजली आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. कार्यकर्ते तयारी पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. गणरायाच्या आगमनाआधी सगळी तयारी पूर्ण व्हावी या उद्देशाने मंडळांची तयारी सुरू आहे. ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. त्याच्या स्वागताला सगळेच उत्सुक आहेत. बाप्पा येणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. ग्राहकांच्या आवडी लक्षात घेता विक्रेत्यांनी बाजारात नवनवीन साहित्य आणले आहे. गणपतीला फक्त जास्वंदी फुलांचा हार न घालता मणी -मोत्यांचे हार घालण्यात येतात. यासह बाजारात कलरफुल, स्टोनचे हार, अ‍ॅक्रेलिक, सॅटीन मटेरियलचा वापर करून तयार केलेले हार आहेत. या हारांची किंमत 50 ते 250 रुपये आहे. सजावटीच्या वेळी वापरण्यात येणारे एकाच रंगाचे पडदे आता विविध कापडांपासून तयार करण्यात आले असून सॅटिन,  टिकली वर्क, मखमली कापडांचे पडदे आहेत. फुलांचा वापर करून सजावटीवर विशेष भर दिला जातो. त्यानुसार  गलंडा, लीली, ऑथम, डच, गोल्डन गुलाब, नेट रोज, कमळ अशा विविध फुलांची विक्री होत आहे. 30 ते 120 रुपये किंमत आहे. आर्ट कागद, लोलक, सॅटीन व फ्लॉवर आर्टिफिशल, प्लेन ग्रास व लॉनमुळे सजावटीत भर पडत आहे. फुलांसह वेगवेगळ्या फळांचे, भाज्यांचे घोस यांचा सजावटीसाठी वापर होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच शहरातील बाजारपेठेत चांदीचे पूजेचे साहित्य उपलब्ध झाले आहे. दुर्वांचे हार, दुर्वा, जास्वंदीची फुलं, कमळ, मोदक, सुपारी, खाऊची पानं, लाडूची प्लेट, हार, नारळाचे हार आदी वस्तू व दागिन्यांचा समावेश आहे.
सजावटीसाठी इलेक्ट्रिकल साहित्यामध्ये लाईट माळा, एलईडी लाईट सेट, विविध रंगीबेरंगी समया, लाईटचे मंडप व कमानी बाजारपेठेत दाखल झाली आहेत. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या बाप्पांच्या तयारीसाठी गणेशभक्तांची धावपळ सुरू झाली आहे.  सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच घरातील बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. प्रतिष्ठान पूजा, सजावट या सर्व गोष्टी नीट होण्यासाठी गणेशभक्तांचे नेटके नियोजन सुरू आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: