Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शांतता कमिटी बैठकीतील चर्चेवर शून्य अंमलबजावणी
ऐक्य समूह
Thursday, September 05, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
फूटपाथवरील अतिक्रमणे जैसे थे; विक्रेत्यांनी आता रस्त्यावरच मांडले आहे ठाण
शशिकांत कणसे
5सातारा, दि. 4 : येथील नियोजन भवनामध्ये पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सातारा शहरातील फूटपाथवर झालेल्या अतिक्रमणांच्या चर्चांचा कूट पडल्यानंतर उत्सवामध्ये ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, अशी भूमिका नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केली असतानाही अद्याप त्यावर शून्य अंमलबजावणी झाल्यामुळे अतिक्रमणे जैसे थेच असून उलट विक्रेत्यांनी आता रस्त्यावरच ठाण मांडण्यास सुरुवात केल्यामुळे चालायचे कोठून? दुचाकी, चारचाकी वाहने चालवायची कशी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
2016 पासून लोकशाही दिनामध्ये सातारा शहरामध्ये 48 अतिक्रमणांच्या तक्रारी प्रलंबित असतानाच आता शहरातील फूटपाथ, मोकळे कोपरे, आरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणावर छोट्या छोट्या अतिक्रमणांचे पेव फुटू लागले आहे. नगरपालिकेने पादचार्‍यांना जाण्या-येण्यासाठी बांधलेले फूटपाथ आता विक्रेत्यांची जहागिरी झाली आहे.  
या फूटपाथवर राजवाडा परिसरात कपडे, फळे, भाजी, रांगोळी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अशीच परिस्थिती जिल्हा परिषद पटांगणापासून विसावा नाकापर्यंतच्या फूटपाथवर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी गणपती उत्सवासाठी लागणार्‍या सजावटीच्या वस्तू, छोटे तंबू, भेळ विक्रेत्यांचे गाडे, सफरचंद, मोसंबी, संत्री यांची दुकाने, भाजीविक्रेते पाहायला मिळत आहेत. सातारा बसस्थानक परिसरातील फूटपाथची अशीच अवस्था झाली आहे. या ठिकाणी तर टपरीवर मटक्याचे आकडे घेतले जातात असा आरोप पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी केला होता. सातारा शहरातील अतिक्रमणे हा विषय या बैठकीमध्ये कळीचा मुद्दा झाला होता. नरेंद्र पाटील, धनंजय जांभळे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करत नगरपालिकेने उत्सवाच्या काळात फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून फूटपाथ सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करावा अशी जाहीर मागणी केली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे यांना फूटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत अशा सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात या सूचनांवर कोणतीही कारवाई झाली नाही.
सातारा शहरात दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मोती चौक, देवी चौक, पोवई नाका, बसस्थानक, राजवाडा या परिसरामध्ये व्यापार्‍यांसह रस्त्यावरच अतिक्रमणे वाढलेली आहेत. बेल-फुले-दूर्वा-हार- रांगोळी विक्रेते, विविध प्रकारच्या बॅग्स, बेडशीट्स, सजावटीचे साहित्य विक्रेते, भेळ, पाणीपुरी विक्रेते यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. परिणामी रस्त्यावरून वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी हा मुद्दा सध्या कळीचा बनला असून सातारा जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेने त्यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: