Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूरवर पुन्हा पुराचे संकट?
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: mn2
5कोल्हापूर, दि. 8 (प्रतिनिधी) : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पंचगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून गेले होते. कोल्हापूरकर या कठू प्रसंगातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर पुन्हा पुराचे संकट घोंघावत आहे. कोल्हापुरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणे भरली असून जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी, कोयनामधून पाण्याचा विसर्ग सुरू असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुराची भीती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे ओसंडून वाहत आहेत. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून 8540 क्युसेक्स, कोयनेतून 70404 क्युसेक्स, अलमट्टीमधून 182000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी दहा वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पाणी पातळी 38.5 फूट इतकी होती. जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आजअखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे हे पाच बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे तीन बंधारे देखील पाण्याखाली आहेत. 
कासारी नदीवरील करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ-तिरपण, ठाणे-आवळे व यवलुज हे सहा बंधारे आणि कुंभी नदीवरील शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे सहा बंधारे तसेच धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव, खोची व दानोळी हे नऊ बंधारे, कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे चार बंधारे आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, कसबा वाळवे, तुरंबे आणि सुळंबी हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी,  सुरुपली बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर हे आठ बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी हे चार बंधारे आणि घटप्रभा नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी असे एकूण 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 गडचिरोलीत पावसाचे थैमान,
300 गावांचा संपर्क तुटला
गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद पडले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान मोठे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने पाणी शहरात घुसले आहे. या पुरामुळे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हेलिकॉप्टरमधून येथील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. प्रशासनाकडून या संपूर्ण भागात हायअलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात 6 आणि 7 तारखेला अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आल होता मात्र हवामान खात्याने आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. कोल्हापूरच्या पूर परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती केली असून त्यांनी ती मान्य करत धरणातून पाणी विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती संभावण्याचा धोका कमी झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: