Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसचे आ. आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re2
 अतुलबाबांचा पृथ्वीराज बाबांना धोबीपछाड, कराड दक्षिणमधील समीकरणे बदलणार
5कराड, दि. 9 : राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक राष्ट्रीय काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य आनंदराव पाटील उर्फ नाना यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी ही किमया साधून पृथ्वीराज चव्हाण यांना छोबीपछाड दिल्याचे मानले जाते. दि. 12 सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
सोमवारी मुंबई येथे झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, डॉ. अतुल भोसले, आ. आनंदराव पाटील व सुनील पाटील यांच्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या प्रवेशामुळे कराड दक्षिणमधील निवडणुकीची समीकरणे बदलणार असून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा फटका बसणार आहे.  
निष्ठेच्या बाबतीत आ. आनंदराव पाटील यांचे जिल्ह्यात व राज्यात उदाहरण दिले जात होते. याचे बक्षीस म्हणून माजी मंत्री शामराव अष्टेकर यांची उमेदवारी डावलून विधानसभेची उमेदवारी व नंतरच्या काळात विधानपरिषदेचे सदस्यत्व पृथ्वीराजबाबांनी प्रतिष्ठा पणाला लावून आनंदराव पाटील यांच्या पदरात टाकले. पृथ्वीराज बाबांच्या किचन कॅबिनेटमधील महत्त्वपूर्ण सदस्य म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात पृथ्वीराजबाबांच्या जवळपास व कार्यक्रमांमध्ये वावरताना आनंदराव पाटील उर्फ नानांची उपस्थिती जेमतेम होती. मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आनंदराव पाटील उर्फ नानांची देहबोली वेगळी जाणवत होती. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व पृथ्वीराज बाबांची जवळीक म्हणजे आनंदराव पाटील उर्फ नानांची वर्तुळाबाहेर  पडण्याची चिन्हे दिसत होती. अती झाले व उतू गेले या म्हणी प्रमाणे नानांना दिली जाणारी वागणूक वेगळ्या पातळीवर गेल्याचा परिपाक म्हणून या भाजप प्रवेशाकडे पाहिले जाईल.  डॉ. अतुल भोसले यांच्या दृष्टीने येत्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमध्ये आनंदराव पाटील उर्फ नानांच्या सक्रिय गटाचा लाभ डॉ. अतुल भोसले यांना फलदायी ठरेल. तेवढाच तोटा पृथ्वीराज बाबांना होईल.  राज्यातील व जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसला ग्रहण लागले असतानाच  ही शेवटची कडी ठरणार आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: