Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विक्रम लँडर सुखरूप
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 10:55 AM (IST)
Tags: mn1
इस्रोकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू
5बेंगळुरू, दि. 9 (वृत्तसंस्था) : चांद्रयान-2 च्या संदर्भात आनंदाची बातमी इस्रोने दिली आहे. या मोहिमेंतर्गत काम करणार्‍या इस्रोच्या एका अधिकार्‍याने माहिती दिली आहे, की विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ उभा आहे. त्याचे नुकसान झालेले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडे तिरके उभे आहे.
या अधिकार्‍यांनी सांगितले, की ‘विक्रमने हार्ड लँडिंग केली आणि ऑर्बिटरच्या कॅमेर्‍याने जे छायाचित्र पाठवले आहे, त्यानुसार कळते, की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभे आहे. ते तुटलेले नाही.
संपर्काची 60 ते 70 टक्के शक्यता : माजी इस्रो प्रमुख
इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी ही माहिती मिळाल्यानंतर सांगितले, की विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची अजूनही 60 ते 70 टक्के शक्यता आहे. टाइम्स नाऊ’शी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली.
आतापर्यंतची स्थिती चांगली : इस्रोचे अधिकारी
इस्रोच्या अन्य एका अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणे कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, आम्हाला जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये हरवलेले एक स्पेसक्राफ्ट शोधण्याचा अनुभव आहे. पण विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. तेथे तशी ऑपरेशन फ्लेक्झिबिलीटी नसल्याने आम्ही त्याला जागेवरून हलवू शकत नाही. जर त्याच्या अँटिनाची दिशा ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरकडे असेल तर आमचे काम सोपे होईल. विक्रम ऊर्जा वापरत आहे, मात्र त्यावर सौर पॅनल लावल्याने त्याची चिंता नाही.
पाणी, बर्फ शोधण्यासाठी ऑर्बिटरला चंद्राच्या
आणखी जवळ नेणार ?
चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल, असा विश्‍वास इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला आहे. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-2 मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले. तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्षं कार्यरत राहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शोध ऑर्बिटरद्वारे लागू शकतो. 
ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आपण इतिहास घडवू,
असा विश्‍वास सिवन यांनी व्यक्त केला. ऑर्बिटरची कक्षा बदलून त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा इस्रोमध्ये विचार
सुरू असल्याचे एका वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाशी
बोलताना सांगितले.
ऑर्बिटरमध्ये एकूण आठ पेलोड आहेत. मोहिमेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण केल्यानंतर ऑर्बिटरची कक्षा बदलण्याचा विचार आहे. लोअर ऑर्बिटमधून कॅमेर्‍याचा पुरेपूर वापर करण्याची योजना आहे. चंद्रापासून 50 किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. अजून यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. ऑर्बिटरचे साडेसात वर्षांचे आयुष्य असल्यामुळे
आम्हाला संधी आहे. ऑर्बिटरमध्ये हाय रिसोल्युशनचे उत्तम कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण चंद्रभूमीची माहिती मिळवता येईल, असे सिवन यांनी सांगितले.
लँडरने आपले कार्य सुरू केले तर हे काम अधिक सोपे होईल. कारण सॉफ्ट लँडिंग झाले असते तर लँडरच्या आत
असलेला सहा चाकी प्रग्यान रोव्हर बाहेर आला असता त्यातून चंद्रावरील माती, पाणी, बर्फ यासंबंधी आणखी उपयुक्त माहिती मिळू शकली असती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: