Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीर भारताचाच भाग
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 10:55 AM (IST)
Tags: mn1
पाक परराष्ट्र मंत्र्याची कबुली
5जिनिव्हा, दि. 10 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली पाकिस्तानने अखेर दिली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत अनेक आरोप केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जम्मू-काश्मीर भारताचा भाग असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, संस्था, एनजीओ यांना भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश का दिला जात नाही?, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे एकाप्रकारे त्यांनी जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (णछकठउ) भारताविरोधात 115 पानांचे डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मांडली. भारताने मानवाधिकारांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर बोलताना काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताविरोधात तथ्यहिन आरोप केले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त तपास समितीची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कुरैशी यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत त्यामध्ये काश्मीरमध्ये मुस्लिमांना जबरदस्ती अल्पसंख्याक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, असे सांगितले. काश्मीरमध्ये स्मशानशांतता असून तिथे भारताकडून नरसंहार केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये सात ते 10 लाख सैनिक तैनात असून जगातील सर्वात मोठा कैदखाना असल्याची टीका कुरैशी यांनी केली आहे. काश्मीरमध्ये सहा हजारांहून जास्त नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी रोहिंग्या आणि गुजरात दंगलीचा उल्लेख केला. काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर बंद करण्यात यावा आणि कर्फ्यू हटवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: