Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात एटीएम मशीन फोडून साडेअकरा लाख लंपास
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 20 : संगमनगर परिसरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने कापून त्यातील 11 लाख 42 हजार 800 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि. 19 रोजी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे संगमननगर परिसरात खळबळ उडाली होती. यामुळे आता एटीएमची सुरक्षितता देखील धोक्यात आल्याचे समोर आले आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील सातारा-कोरेगाव रस्त्यावर संगमनगर येथील हॉटेल मीन परिसरात आयडीबीआय बँकेचे आयडी 048512 क्रमांकांचे एटीएम सेंटर आहे. दि. 19 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम सेंटरचे सेफ्टी लॉक तोडले. एटीएमचे मशीन फोडून चोरट्यांनी मशिनमधील 11 लाख 42 हजार 800 रुपये रकमेवर डल्ला मारून पोबारा केला. गुरुवारी सकाळी बँकेतील कर्मचारी पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी तोडफोड झाल्याचे दिसून आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ या घटनेची माहिती बँकेतील अधिकार्‍यांना व शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. ठसे तज्ञ व श्‍वान पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील भेट दिली. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर सीसीटीव्हीची माहिती घेतल्यानंतर बुधवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सीसीटीव्ही   सुरु होता. त्यानंतरमध्ये सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याचे समोर आले.
याबाबत आयडीबीआय बँकेतील अधिकारी जयंत चिंतामणी पालकर (वय 52), रा. देवेश अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा उलगडा करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरु केला असून बाहेरील सीसीटीव्ही फुटेजवरुन काही दुवे हाती येण्याची शक्यता तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. चोरट्यांनी चोरी करताना प्रथम सीसीटीव्ही टार्गेट करुन तो फोडला व त्यानंतर चोरी केली. मध्यरात्री ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संगमनगर परिसरातील चोरीच्या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. चोरीच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी एटीएम फोडले असून एटीएम फोडीचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, एटीएम मशीन फोडून एवढी मोठी रक्कम लुटून नेण्याची ही घटना पहिलीच ठरली आहे. एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी शहरातील काही बँकांनी त्यांच्या एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तसेच आतील भागात सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र काही एटीएमची सुरक्षा मात्र रामभरोसे असल्यानेच हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी यापूर्वी बँकांच्या व्यवस्थापनांना एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक तैनात करण्याबाबत लेखी सूचना केल्या आहेत. मात्र, बँक व्यवस्थापनाकडून सुरक्षा रक्षक नेमणे परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. निदान रात्रीच्या वेळी तरी एटीएम केंद्रांवर सुरक्षा नेमणे आवश्यक असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: