Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छत्रपतींच्या विरोधात जाणत्या राजाचे रणशिंग?
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 20 : पक्ष कोणताही असो नेहमीच आपल्या अनोख्या अंदाजाने देशभर चर्चेत असलेल्या उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला पोरके केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत असतानाच आता छत्रपतींना लढत देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा  आणि जाणता राजा अशी ओळख असलेले शरद पवार हे स्वत: मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेला सध्या जिल्ह्यात उधाण आले आहे.
अपवाद वगळता पराभवाचे तोंडही न पाहिलेले उदयनराजे आणि कधीच पराभूत न झालेले शरद पवार अशी लढत झालीच तर ती संपूर्ण भारतातील मोठी लढत ठरणार यात शंका नाही. उदयनराजेंना सातार्‍यात पराभूत करेल असा एकही उमेदवार सध्या तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे नाही अशी चर्चा सुरु असताना याआधी त्यांच्या विरोधात उभ्या केेलेल्या पर्यायाची ताकद किती आहे  याचा विचार करावा लागेल. रामराजे नाईक-निंबाळकर हा पर्याय बरा होता मात्र, त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकत सेनेत सामील होण्याचे संकेत दिल्याने हा पर्याय सध्यातरी बारगळला आहे. दुसरा पर्याय आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा मात्र, त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील हा चांगला पर्याय असू शकतो. मात्र, त्यांची सारी मदार कार्यकर्त्यांवर आहे. त्यांचा स्वत:चा असा मतदार या जिल्ह्यात नाही. अशातच त्यांनी राज्यपालासारखे मोठे पद भूषवले असल्याने ते पुन्हा खालच्या स्तरावर येण्याची शक्यता कमी आहे. शशिकांत शिंदे किंवा इतर कोणताही राष्ट्रवादीचा नेता उदयनराजेंसमोर टिकाव धरु शकणार नाही हे समजण्याइतपत राष्ट्रवादी नक्कीच दूधखुळी नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्याने अचानक चर्चेत आलेले आणि याआधीच्या निवडणुकीत विरोधक असलेले नरेंद्र पाटील जर राष्ट्रवादीत आले तर काही अंशी फरक पडू शकतो. मात्र, त्यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करताना व्हाया राष्ट्रवादी तिकिटासाठी आधी भाजप नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास मारक ठरु शकतो. याआधी भाजपसारखा मोठा पक्ष त्यांच्या पाठीशी होता. भाजपचे कट्टर मतदार उमेदवार कोण आहे हे न पाहता कमळाकडे पाहून मतदान करतात हे सर्वश्रृत असल्यामुळे ती मते त्यांना कधीही मिळणार नाहीत. राहता राहिला तो माथाडी कामगार. त्यांची संख्या कितीही मोठी असली तरी निवडणूक जिंकून देण्याची क्षमता त्या संख्येत निश्‍चित नाही.  यापूर्वी भाजपला मतदान केलेले मतदार यावेळी जो उमेदवार असेल त्यालाच मतदान करणार ही काळ्या दगड्यावरची रेघ आहे. माथाडी कामगारांमध्ये अनेक संघटना आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटील हा सक्षम पर्याय असू शकत नाही. विक्रमसिंह पाटणकर यांचाही पाटण तालुका सोडला तर इतर भागावर फारसा प्रभाव नाही.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे सध्या आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील हे नेते वगळता एकही मोठा नेता नाही. याआधी उदयनराजेंना मदत करणार्‍यांपैकी जयकुमार गोरे आणि मदन भोसले हे दोघेही भाजपवासी झाले आहेत. पक्षाचा आदेश झाल्यानंतर आणि वैयक्तिक संबंध पाहता हे दोघेही उदयनराजेंना मदत करणार हे सांगण्याची गरज नाही.     
उदयनराजेंना यावेळी मिळणार्‍या मदतीमध्ये भाजप हा मोठा ‘फॅक्टर’ आहेच त्याचबरोबर त्यांचा स्वत:चा असा वेगळा चाहता वर्ग आहे. युती झाल्यास नव्हे ती होणारच आहे असे गृहीत धरले तर शिवसेनेला मानणार्‍या पाटण आणि जावली या मतदारसंघातून राजेंना पाठबळ मिळणार आहे. फलटणमध्ये रामराजे जर शिवसेनेत गेले तर त्यांनाही राजेंना मदत करण्यावाचून पर्याय नाही. असे असले तरी जर स्वत: शरद पवारांनी शड्डू ठोकला तर काही प्रमाणात ही गणिते उलटीपालटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सर्वाधिक आमदार देणार्‍या सातारा जिल्ह्याने शरद पवारांवर कायमच प्रेम केले आहे. पवारांचे मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे असल्याने त्या अर्थाने ते मूळ सातारकरच आहेत असा एक मतप्रवाह त्यावेळी अचानक पुढे येण्याची शक्यता आहे. रयत शिक्षण संस्थेसारखी मोठी संस्था शरद पवारांच्या नजरेच्या इशार्‍यावर चालते. स्वत: शरद पवार हे  राजकारणातील मुरब्बी नेते असल्याने ऐनवेळी ते काय खेळी करतील हे कोणीही सांगू शकत नाही. उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी लढत झाल्यास या लढतीची गणना भारतातील ‘हाय व्होलटेज’ लढतीमध्ये होणार आहे हे निश्‍चित. ही माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साद घालण्याचा ‘फंडा’ही निकालाचे फेरे उलटे करु शकतो याची जाण शरद पवारांना आहे. छत्रपतींच्या दिमतीला प्रचंड मोठी फौज असताना जर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात लढण्याचा पवित्रा घेतला तर ही लढत लुटूपुटूची होणार नाही याचीही दक्षता पवारांकडून घेतली जाईल अशी अटकळ आहे. त्याचे कारण पराभव झाल्यास तो जाणत्या राजाचा असणार आहे असा प्रचार होण्याचीही शक्यता आहे. उदयनराजेंना टक्कर देवू शकेल असा एकही प्रभावशाली नेता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे नसल्याने आणि ही
लढत जर राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली तर त्यांच्याकडे शरद पवार
हे एकच तुल्यबळ नाव असू शकते. भाजपने उदयनराजेंसारखा प्रभावशाली नेता आपल्याकडे खेचून निम्मी लढाई जिंकली आहे असे वाटत
असले तरी शरद पवारांनी जर या रणसंग्रामात उडी घेतली तर निकालावर देशभर पैजा मात्र नक्कीच लागतील. घोडामैदान लांब नाही
तरी तीनच महिन्यात पुन्हा त्याच लोकसभेच्या मांडवाखालून जाण्याच्या तयारीत असलेले उदयनराजे आणि अशा अनेक मांडवामधील नवरदेव ठरवणारे, त्यांना घोड्यावर बसवणारेही आणि पाडणारेही जाणते
राजे शरद पवार यांच्यामध्ये लढत होणार का? या चर्चेत मश्गूल असलेला मतदाराजा शरद पवार याबाबत एखादा संकेत देतात, की थेट उमेदवारीचे रणशिंग फुंकून ही ‘हाय व्होलटेज’ लढत प्रतिष्ठेची करतात याकडे लक्ष ठेवून आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: