Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली महिलांची सुमारे 3 कोटीची फसवणूक
ऐक्य समूह
Tuesday, September 24, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: re1
बारामती, पुरंदर, खंडाळ्यासह फलटण तालुक्यात खळबळ
5बारामती, दि. 23 : मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण या चार तालुक्यातील सुमारे 1500 महिलांची सुमारे 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कच्चा माल देतो, मेणबत्त्या बनवून द्या असे सांगून लोणंद येथील विठू माउली गृहउद्योगच्या राजन भिसे व अभिजित डोंगरे यांनी फसवणूक केली आहे. रविवारी सोमेश्‍वरनगर येथील महिलांनी रुद्रावतार धारण करीत करंजे पूल येथील पोलीस चौकीसमोर दिवसभर ठिय्या देत दोषी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, याच प्रकरणात लोणंदच्या एका महिलेने आत्महत्या केली असून हताश झाल्याने सोमेश्‍वरनगरच्या एका महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  सुमारे एक वर्षापूर्वी बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यातील महिलांना मेणबत्ती व्यवसाय करण्यास कर्ज देण्याचे आमिष दाखवून आम्हीच तो माल परत घेवू असे सांगत प्रत्येकी 20 हजार रुपये कर्ज देण्यात आले होते. 
लोणंद (ता. खंडाळा ) येथील विठू माउली गृहउद्योगचे राजन भिसे यांचा मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढीस लागल्यानंतर पुरंदरच्या अजित मल्टिस्टेट बँकेच्या माध्यमातून प्रत्येकी 20 हजाराचे कर्ज एजंट अभिजित डोंगरे याने संबंधित महिलांना  काढून दिले. अर्ज भरताना कर्जाबाबत त्यांना काहीही माहिती नव्हते. ट्रेनिंग, कच्चा माल, साचा यांच्या नावाखाली या महिलांकडून 10 हजार घेण्यात आले होते. यामधून एजंटांना मोठे कमिशन मिळू लागल्याने त्यांनी याचा मोठा विस्तार केला. यामध्ये चार तालुक्यातील शेकडो महिलांची फसवणूक झाल्याने अतिशय गरीब कुटुंबातील महिला हतबल झाल्या आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या महिलांनी राजन भिसे आणि एजंट अभिजित डोंगरे यांना फोन करून पैसे मागितले. मात्र, ते दोघेही महिलांचे
फोनही घेत नव्हते आणि पैशाबाबत काहीही बोलत नसल्याने अखेर महिलांनी रविवारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या महिलांकङे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याने आणि दिलेले चेक वटत नसल्याने न्याय कोणाकडे मागावयाचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
विठू माउली गृहउद्योगचे राजन भिसे आणि अजित मल्टिस्टेट बँकेचा करार झाला होता. मात्र, बँकेच्या नियमानुसार त्यांचे काम चालत नसल्याने बँकेने त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. वास्तविक कर्ज काढून देताना बँकेचा
हप्ता आम्ही भरणार अशी ग्वाही या गृहउद्योग चालकाने दिली
होती. मात्र आजपर्यंत एकही हप्ता  भरलेला नाही. संबंधित महिलांना त्यांच्या वकिलामार्फत नोटीस पाठवून थकीत रक्कम भरण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या महिला गोँधळून गेल्या आहेत. या महिलाच एकमेकींना जामीनदार आहेत. फसवणूक झालेल्या महिलांमध्ये वाघळवाडी, निंबूत, सोमेश्‍वरनगर, करंजे, वाणेवाडी, जेजुरी, गोंदावले, काळज, तरडगाव, खंडाळा, वाठार कॉलनी  येथील महिलांचा मोठा सहभाग आहे.
 राजन भिसे व अभिजित डोंगरे यांनी संगनमत करून आमची फसवणूक केली आहे. आम्ही घेतलेले कर्ज वरील दोघांनीही
परत केले असूनही आम्हाला अजित मल्टिस्टेटकडून हप्ते
भरण्याबाबत नोटिसा आल्या आहेत. या सर्व प्रकरणाची
व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी पारदर्शकपणे चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई  करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वडगाव-निंबाळकर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.
याबाबत अजित मल्टिस्टेट बँकेकडे तसेच विठू माउली गृह उद्योगाच्या  कागदपत्रांची चौकशी करण्यात येईल तसेच लोणंद पोलिसांकडे महिलांनी काय तक्रार दिली आहे, याबाबत चौकशी करून दोषींवर निश्‍चितपणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक राजाराम साळुंखे यांनी सांगितले.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: