Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शरद पवार उभे राहिले तर निवडणूक लढणार नाही : उदयनराजे
ऐक्य समूह
Wednesday, September 25, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 24 : शरद पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर होता, आहे आणि राहील. सातार्‍यातून ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाही, असे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
शरद पवारांबद्दल कालही आदर होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आज महाळ आहे. पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे, असे सांगताना ते भावूक झाले. पूर्वजांनंतर पवार साहेबच माझ्यासाठी सर्व काही आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही. पण दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी, एवढीच आपली अपेक्षा आहे.
माझ्यासाठी वडिलांनंतर फक्त शरद पवारच
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांच्याकडून सतत तुमच्यावर टीका केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते असा प्रश्‍न उदयनराजे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उदयनराजे म्हणाले, वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला प्रेम आणि आधार दिला.  बस्स, आणखी काय बोलणार त्यांच्याबद्दल’. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजेंचा आवाज जड झाला होता.   
अनेकदा बोलताना ते अडखळले. मध्येच थांबत त्यांनी आपले
अश्रू पुसले.
कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाही तर फाडून टाकेन माझी स्टाईल हा माझा खासगी प्रश्‍न आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाही तर फाडून टाकेन. तुम्हाला त्याच्याशी काय देणेघेणे आहे, असा सवाल श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी टीकाकारांना विचारला. उठसूट कोणाचेही ऐकून घ्यायला मी काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. ऐन तारुण्यात मी तुरुंगात गेलो. मात्र, आपण नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उदयनराजे यांनी राजेशाहीचा आरोप करणार्‍यांनाही उत्तर दिले. राजेशाही असती तर मी बलात्कार करणार्‍यांना थेट गोळ्या
घातल्या असत्या, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी माझ्यावर राजेशाहीचा आरोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित राजकारण करावे असे ते म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: