Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबरला पोटनिवडणूक
ऐक्य समूह
Wednesday, September 25, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 24 :  राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर रोजीच पोटनिवडणूक घेण्यात येणार असून दि. 24 रोजी मतमोजणी होणार आहे. सातारा लोकसभा पोट-निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपत प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. परंतु 21 सप्टेंबरला महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताना या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला नव्हता. त्यामुळे ही पोटनिवडणूक केव्हा होणार याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आयोगाने आज हा संभ्रम संपवताना पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 27 सप्टेंबर रोजी या पोटनिवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून 5 ऑक्टोबर रोजी छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.   
15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी लागणार!
सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी 15 हजार कर्मचार्‍यांची अतिरिक्त गरज भासणार असून, त्याची तजवीज करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: