Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ही उदयनराजेंची चाणक्यनीती असू शकते?
ऐक्य समूह
Friday, September 27, 2019 AT 11:39 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 26 : तीनच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या उदयनराजेंना भाजप प्रवेशामुळे पुन्हा त्याच  प्रक्रियेमधून जात आपले नेतृत्व सिद्ध करावे  लागणार आहे. गतवेळी विरोधी पक्ष असलेल्या पक्षातूनच ते आता निवडणूक लढवणार असल्याने मागील वेळीचा पक्ष त्यांचा विरोधक असणार आहे. राजकारणात काहीही घडू शकते याचा प्रत्यय या निमित्ताने सातारकरांना प्रथमच येणार आहे. उदयनराजेंसमोर यावेळी विरोधक म्हणून अनेकांची नावे पुढे येत असताना शरद पवार उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाही अशी भावनिक साद घालत उदयनराजेंनी  चाणक्यनीतीचा वापर करत शरद पवार समोर येणार नाहीत याचा खुट्टा हलवून बळकट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.
उदयनराजे  राजकारणात मुरब्बी आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांची राजकीय प्रगल्भता विकसित होत असताना गत वीस पंचवीस वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे हे मान्यच करावे लागेल.  शरद पवारांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा जसा थांगपत्ता आजवर कोणाला लागलेला नाही तसेच उदयनराजेंच्याही मनात नेमके काय चालले असते याचा अंदाज आजपर्यंत कोणालाच आलेला नाही. अगदी उजवे डावे दोन्ही हात समजल्या जाणार्‍या अतिशय विश्‍वासू कार्यकर्त्यांनाही उदयनराजे नेमके कोणत्या वेळी काय निर्णय घेतील हे आजवर सांगता आलेले नाही.
 उदयनराजेंची स्वत:ची ताकद अधिक भाजपची रसद याचा विचार केला तर उदयनराजेंचे पारड अधिक जड असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हा कळीचा मुद्दा ठरणार हे नक्की आहे. इतर पक्षातील नेत्यांचे भाजप पक्ष प्रवेश जसे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले तसा उदयनराजेंचा प्रवेश हा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडला यालाही मोठे कारण आहे. उदयनराजेंचा तसा आग्रहही होता.
उदयनराजेंचा भाजप पक्ष प्रवेश किती जणांना रुचला आणि पचला हे आत्ताच सांगता येणार नाही. अशातच पालिकेपासूनचे त्यांचे विरोधक असलेले बंधू शिवेंद्रराजे यांनीही भाजपतच त्यांच्या आधी केलेला प्रवेश उदयनराजेंना किती लाभदायक होणार हे येत्या निवडणुकीत समजणार आहे. मनोमीलनाचे तीन तेरा वाजले असताना एकाच पक्षात राहून ते आपली भाऊबंदकी अशीच सुरू ठेवणार, की मागील निवडणुकीसारखे पक्षादेश मानून त्यांचे मनापासून काम करणार हे कोडे पक्षातील नेत्यांप्रमाणेच, सामान्य कार्यकर्ते व  नागरिकांनाही पडले असणारच यात शंका नाही.
दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यामांशी बोलताना उदयनराजेंनी शरद पवार माझ्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे असतील तर मी निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले होते. प्रसारमाध्यमांनीही त्यांचे केवळ हेच वाक्य हायलाईट केले. त्यापुढे उदयनराजे असेही म्हणाले होते, की पवारांनी  दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी याचा नेमका अर्थ काय?     
एखाद्या खासदाराला आपला बंगला देता येतो का? मग उदयनराजे असे का म्हणाले? उदयनराजे असे एखादे वाक्य टाकून नेहमीच संभ्रम निर्माण करतात. खरे तर ती त्यांची राजकीय प्रगल्भता व  चाणक्यनीती आहे असे राजकीय जाणकारांचे अनुमान आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: