Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निजामांचा 306 कोटींचा खजिना भारताला मिळणार
ऐक्य समूह
Thursday, October 03, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: na1
5लंडन, दि. 2 (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या निजामाच्या 3 अब्जांपेक्षा अधिक रकमेच्या मालकी हक्कावरून भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली कायदेशीर लढाई अखेर संपली आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणी भारताच्या बाजूने निकाल दिल्याने निजामाचा हा खजिना भारताच्या हवाली केला जाणार आहे.
गेल्या 70 वर्षांपासून ब्रिटनच्या उच्च न्यायालयात हा खटला सुरू होता. हैदराबादच्या निजामाच्या या संपत्तीवर भारत आणि निजामांच्या उत्तराधिकार्‍यांचाच अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. निजामाचे वंशज प्रिन्स मुकर्रम जाह आणि त्यांचे लहान बंधू मुफ्फखम जाह या खटल्यावेळी भारताच्या बाजूने होते. भारताच्या फाळणीवेळी हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी लंडनच्या नेटवेस्ट बँकेत 1,007, 940 पाऊंड म्हणजे सुमारे 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते. आता ही रक्कम वाढून 3 अब्ज 8 कोटी 40 लाख रुपये एवढी झाली आहे. एवढ्या मोठ्या खजिन्यावर भारत आणि पाकिस्तानने दावा केला होता. लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे जज मार्कस स्मिथ यांनी यावर निर्णय दिला आहे. हैदराबादचे 7 वे निजाम उस्मान अली खान यांच्या मालकीची ही संपत्ती होती. त्यांच्यानंतर त्यांचे वंशज आणि भारत या संपत्तीचा दावेदार असेल, असे मार्कस स्मिथ यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने 7 व्या निजामाच्या वंशजांना उत्तराधिकारी म्हणून स्वीकारल्याबद्दल आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. 1948 पासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते, असे हैदराबादच्या निजामाची बाजू मांडणारे वकील पॉल हेविट यांनी म्हटले आहे. दरम्यान, हैदराबादच्या तत्कालीन निजामाने 1948 मध्ये ब्रिटनमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना ही रक्कम पाठवली होती.
तेव्हाच्या हैदराबादच्या निजामाला नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानशी आपुलकी होती. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तेथे पैशाची कमतरता असल्याचे अनेकांकडून त्यांना कळत होते.
 अशा परिस्थितीत सर्वांची नजर हैदराबादच्या निजामाच्या संपत्तीवर होती. तेव्हाच्या कायद्यानुसार भारतातून थेट पाकिस्तानामध्ये पैसे पाठवता येत नव्हते. त्यामुळेच निजामाने पाकिस्तानचे इंग्लंडमधील उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या लंडनमधील बँकेत पैसे पाठवले. पण भारतातील निजामाच्या वंशजांनी त्यावर दावा ठोकला. हे सर्व वंशज भारताचे समर्थक होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: