Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महायुतीला महाजनादेश मिळेल : देवेंद्र फडणवीस
ऐक्य समूह
Saturday, October 05, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. महाराष्ट्राच्या मनातली महायुती मैदानात उतरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल. कुणी अतिशयोक्ती म्हणेल पण महाराष्ट्रात कधीच कुणाला प्रतिसाद मिळाला नाही इतका प्रतिसाद या निवडणुकीत महायुतीला मिळेल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
हिंदुत्वाचा धागा भाजप आणि शिवसेनेला जोडणारा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी तमाम जनतेची अपेक्षा होती आणि त्यानुसारच आमची युती झाली आहे, असे सांगताना महायुतीत सगळ्यांनाच काही प्रमाणात तडजोड करावी लागते. युतीसाठी ते करावेच लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.  
बंडखोरांना इशारा
राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पुढच्या दोन दिवसात सगळ्या बंडखोरांना माघार घ्यायला लावणार आहोत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकतील व बंडखोरी राहणार नाही, असे आम्हाला वाटते. त्यानंतरही बंडखोरी राहिल्यास त्याला युतीत स्थान नसेल. त्याला त्याची जागा महायुती दाखवेल,  असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
तिकीट कापले नाही, जबाबदारी बदलली!
एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याबाबत विचारले असता याला तिकीट कापले असे म्हणता येणार नाही. पक्षात जबाबदार्‍या बदलत असतात. त्यांची जबाबदारी आता बदलली आहे. त्यांच्या जागी दुसर्‍या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
असा आहे युतीचा फॉर्म्युला
महायुतीत शिवसेनेला 124 जागा देण्यात आल्या आहेत. शिवाय भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या दोन जागा शिवसेनेला मिळणार आहेत. अन्य घटकपक्षांना 14 जागा सोडण्यात आल्या आहेत आणि उरलेल्या 150 जागा भाजप लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू
गेली 5 वर्षे आम्ही राज्याला गती दिली. बरेच प्रश्‍न मार्गी लागले आहेत  आणि अजूनही खूप प्रश्‍न बाकी आहेत. त्यावर पुढील पाच वर्षात जास्तीत जास्त भर देणार आहोत. दुष्काळी भागावर आमचा फोकस असणार आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असून वाहून जाणारे पावसाचे सर्व पाणी साठवून दुष्काळी भागाला देऊ व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचे स्वागत
आदित्य ठाकरे हे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत दिसणार आहेत. त्यांचे मी स्वागत करतो, असे नमूद करताना आदित्य हे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आदित्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात फिरत आहेत. त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एक तरुण नेतृत्व पुढे येत असल्याचा निश्‍चितच आनंद आहे. आदित्य यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न असल्याबद्दल विचारले असता त्याची तुम्हाला इतकी घाई का, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना केला.
आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसते : उद्धव
आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे. युतीत शिवसेनेला मिळालेल्या निम्म्यापेक्षा कमी जागा याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली असता तुझे माझे करत राहण्यापेक्षा आम्ही महाराष्ट्राचा विचार करून युती केली आहे, असे सांगत त्यांनी सारवासारव केली. आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसते. मनापासून युती झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपापसात बसून ठरवता येतात. दोन्ही पक्ष समजूतदार आहेत. त्यामुळे लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याचा विचार करत बसण्यापेक्षा दोन्ही भाऊ एकत्र पुढे चालले आहेत. आमच्यात ज्या गोष्टी ठरल्यात त्या मी येथे उगाळत बसणार नाही. आदित्यचे सक्रिय राजकारणातील हे पहिले पाऊल आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे त्याचे स्वप्न आहे, इतकेच मी येथे सांगेन. कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर बोट ठेवून कणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने उभी ठाकली आहे, असे विचारले असता तिथे आम्ही आमनेसामने असलो तरी येथे बाजूबाजूला बसलो आहोत. त्यामुळे त्याची चिंता नसावी. त्यावर आम्ही तोडगा काढू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: