Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नरेंद्र मोदी यांच्या सभांचा सातार्‍यातून शुभारंभ
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: mn1
राज्यात मोदींच्या 9 तर शहांच्या 18 सभा, दि. 17 रोजी सातारा व पुण्यात मोदींची सभा
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे पहायला मिळत आहे. कारण राज्यात महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या या दोन स्टार प्रचारकांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 तर शहांच्या 18 सभा होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरयाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ 9 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी 17 ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीही सभांचे नियोजन सुरू आहे. पुण्यातील सभेच्या जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अमित शहा यांच्या सभांच्या तारखा आणि ठिकाणही अद्याप निश्‍चित झाले नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.  महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु भाजपने उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये प्रवेश देवून याच बालेकिल्ल्याला सुरूंग लावला होता. अवघ्या तीन महिन्यात उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमधून लढण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आमदारकीचे तिकीट मिळवले. या दोन्ही राजांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय भूकंप झाला होता. बालेकिल्ला ढासळतो, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या हाती घेत युवकांना नव संजीवनी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चैतन्याचे वातावरण पसरले आहे. मात्र, उदयनराजेंचे पक्ष सोडणे राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उदयनराजेंना पराभूत करायचेच असा चंग राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बांधला. उदयनराजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी बैठका झाल्या. त्यातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले. परंतु त्यांनी माघार घेतल्यामुळे श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपच्या दृष्टीने ही सीट खूप महत्त्वाची असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उदयनराजे भोसले यांना निवडून आणायचे एवढे एकच लक्ष सध्या भाजपचे आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांची पहिली सभा सातार्‍यातून घेत प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे या सभेकडे लक्ष लागणार आहे. या सभेत मोदी काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: