Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
27 मतदारसंघात 114 बंडोबांना थंड करण्याचे मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता भाजप समोर बंडोबांना थंड करण्याचे सगळ्यात मोठे आव्हान आहे.  288 मतदारसंघात मित्रपक्षांसह भाजपच्या कमळावर तब्बल 164 अधिकृत उमेदवारांनी भाजपच्या बी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरला आहे. यामध्ये अनेक उमेदवार आयात केलेले आहेत तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना डच्चू देऊन नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे. त्यामुळे या सर्व मतदारसंघात स्थानिक पातळीवर असंतोष असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
सद्य:स्थिती पाहता खरंतर भाजपच्या ‘अब की बार 220 पार’ या नार्‍याला बंडोबा मोठा सुरुंग लावू शकतात. त्यामुळे या बंडोबांना शांत करून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. उद्या म्हणजे 7 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.  मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व दौरे रद्द करून ते सध्या मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. प्रत्येक बंडखोराला हॉटलाइनवर संपर्क साधून आश्‍वासनांची खैरात दिली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तरीही उमेदवारी मागे घेतली नाही तर महायुतीत यापुढे कुठलेही स्थान नसेल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
भाजपने अशा एकूण 114 बंडखोरांची यादी तयार केली आहेे. 27 मतदारसंघात या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक बंडखोरी कोल्हापूरच्या चंदवड या मतदारसंघात झाली आहे. चंदवडच्या जागेवर भाजपचा डोळा होता मात्र या जागी शिवसेनेचा उमेदवार लढत असून या ठिकाणी एकूण 9 बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाडापाडीचे राजकारण रंगणार आणि त्याचा फटका महायुतीला बसणार, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे किती जण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात आणि किती बंडखोर भाजपची डोकेदुखी वाढवतात यावरून भाजपचे सत्ता स्थापनेचे गणित ठरणार हे मात्र निश्‍चित आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: