Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्री शब्दाला जागणारा माणूस म्हणूनच आज मी त्यांच्यासोबत ः गोरे
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: re4
5खटाव, दि. 9 ः आजपर्यंत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा मी अभ्यास केला आहे. काही कार्यक्षम मुख्यमंत्र्यांचा राज्याचा कारभार दिशादर्शक व राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारा होता. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व शासन लोकांसाठी असते, विकासकामांबाबत निर्णय घेताना कायद्याच्या अडचणी येत नाहीत हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. राजकारणाच्या पलीकडे व्यक्तिगत संबंध, मैत्री जपणारा व शब्दाला जागणारा माणूस मी त्यांच्यात पाहिला. म्हणूनच आज मी त्यांच्यासोबत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
दहीवडी येथे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जयकुमार गोरे म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझ्या मतदारसंघाचा दुष्काळ हटविण्यासाठी काही मागण्या केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनीही सगळ्या कामांसंदर्भात त्वरित सकारात्मकता दाखवली. माझ्या माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. जिहे कठापूर योजनेत बदल करून आंधळी धरणातून वाढीव योजना केली तर या गावांना पाणी देता येईल, असे सांगताच मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. लगेच सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या योजनेला 4 दिवसात मंत्रिमंडळाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून तब्बल 284 कोटींचा निधीही मंजूर केला. आज त्या योजनेच्या कामाचे भूमिपूजन होवून कामेही सुरू झाली आहेत. या क्रांतिकारी निर्णयाबरोबरच खटाव तालुक्यातील मायणीसह 16 व माण तालुक्यातील कुकुडवाडसह 16 गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळावे, अशी मागणी मी केली. कार्यतत्पर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नी स्वतः लक्ष घालून लवादाने केलेल्या पाणी वाटपाचे पुन्हा मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. पाण्याचे फेरवाटप करून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक पावले उचलली आहेत. हे पाणी देण्यासाठी त्यांनी 286 कोटींची तरतूद केली आहे.
गोरे म्हणाले, खटाव व माण तालुक्यात सध्या सुरू असणारे उरमोडीचे पाणीही मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाने सुरू आहे. या पाण्याचे वीजबिलही सरकारच भरणार आहे. उरमोडी योजनेचे 7 पंप सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी येत आहे. मतदारसंघातील 97 गावांमध्ये पाणी पोहचले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने आणखी 64 गावांचा पाणीप्रश्‍न मार्गी लागला आहे. मी सर्वच मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल अभ्यासला आहे. त्यामध्ये वसंतदादा पाटलांचा दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होवून त्यांना बळ देणारा, शासन व कायदा लोकांसाठी आहे याची जाण असणारे नेतृत्व त्यांच्याकडे होते. विलासराव देशमुखांकडे प्रचंड जनसंपर्क असणारे व संघटन मजबूत करणारे नेतृत्व होते. हे सगळे गुण एकत्रित असणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. प्रचंड ग्रास्िंपग पॉवर, अडचणी समजून घेण्याची मोठी क्षमता, त्यातून मार्ग काढण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. विकासकामे करताना कायदा अडवा येत नाही, असे ठामपणे मानून बेभान होवून ते कामे करतात. आज महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. अशा सर्वगुणसंपन्न नेतृत्वाबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे निश्‍चित सोने होणार आहे. माण - खटावच्या विकासाचे सर्व प्रश्‍न मार्गी लागणार आहेत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांच्या आकलनापलीकडचे नेतृत्व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही अशक्य निर्णय घेतले आहेत. विरोधकांना कर्जमाफी होईल व मराठा आरक्षण मिळेल, असे वाटलेच नव्हते. मात्र जिगरबाज मुख्यमंत्र्यांनी ते करून दाखवले. राज्याच्या भल्याचे निर्णय घेताना त्यांनी घेतलेली कणखर भूमिका विरोधकांना नेहमीच तोंडघशी पाडत आली आहे. विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: