Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दसर्‍यानिमित्त सातार्‍यात शाही मिरवणूक
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 : सातार्‍यात मंगळवारी शाही दसरा उत्साहात साजरा झाला. पोवई नाका येथे ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले तसेच सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी जलमंदिरात श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या भवानी तलवारीचे पूजन केले. यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे,  सुनील काटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी रिमझिमत्या पावसामध्ये आदिशक्तींना विसर्जन तळ्यांमध्ये विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला.
तलवारीचे पूजन केल्यावर भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात आली. गाववेशीच्या बाहेर सीमोल्लंघन करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुतार्‍यांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली तसेच फेटाधारी युवक होते. राजपथावरून ही मिरवणूक पोवई नाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे पंचोपचार पूजन उदयनराजे भोसले व वीरप्रतापसिंह राजे भोसले यांनी केले. वेदमूर्ती उपेंद्रशास्त्री धांदरफळे यांनी पौरोहित्य केले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन कृत्रिम तळ्यात करण्यात आले. अनेक मुख्य रस्ते मिरवणुकीमुळे बंद करण्यात आले होते.  
सातार्‍यात सदरबझार व बुधवार नाका या दोन ठिकाणी सातारा शहर व परिसरातील 92 सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी रिमझिमत्या पावसामध्ये आदिशक्तींना विसर्जन तळ्यांमध्ये विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला. दुपारी साडेबारा वाजता तांदूळ आळी येथे प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली.  दुर्गादेवीच्या भक्तांनी मिरवणुकीची मोठी तयारी केली होती. दुर्गानवमीची आरती, औक्षण ओटी भरण या पारंपरिक विधीनंतर मंडळांच्या देवी दुपारनंतर विसर्जन मिरवणुकीसाठी मोती चौकाकडून बुधवार नाक्याकडे कमानी हौद, शेटे चौक मार्गे बाबर कॉलनीकडून विसर्जन तळ्याकडे मार्गस्थ झाल्या. गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यातच देवींचे विसर्जन करण्यात आले. जलसंपदा विभागाची सत्तर टनी क्रेन,  सातारा पालिकेचे चौतीस कर्मचारी, बारा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर अशा व्यवस्थेत मिरवणूक टप्याटप्याने मार्गस्थ होत राहिली.  तब्बल सोळा तास चाललेल्या या मिरवणुकीत 92 देवींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. रात्री दीड वाजता सदर बझार येथील भारतमाता चौकातील नवदुर्गा व मोती चौकातील प्रतापसिंह मंडळांची देवी  समोरासमोर मिरवणुकांच्या निमित्ताने राजपथावर आल्या.  मात्र या दोन्ही मंडळांच्या देवींच्या मूर्ती या फायबरच्या बनवण्यात आल्याने वाजत गाजत मिरवणुकीने त्या माघारी नेण्यात आल्या. 
सातारकरांनी या विसर्जन मिरवणुकीत हिरिरीने भाग घेतला. रात्री सव्वादहाच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरवात झाली मात्र मिरवणुकीच्या उत्साहात कोणताही व्यत्यय आला नाही.
प्रताप सिंह शेती फार्मच्या पिछाडीला असणार्‍या विसर्जन तळ्यात साठ तर सदरबझार येथील दगडी शाळा परिसरात बनवण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात तीस देवींचे विसर्जन करण्यात आले.  बुधवारी पहाटे पावणेपाचच्या दरम्यान शेवटच्या दुर्गामूर्तीचे विसर्जन झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: