Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जन्मदात्याकडून दोन मुलांचा गळा दाबून निर्घृण खून
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: mn1
नराधम पिता शिरवळ पोलिसांच्या ताब्यात
5खंडाळा, दि. 9 : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील कॅप्सूल कंपनीनजीक बुधवारी पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये जन्मदात्या पित्याने आपल्या दोन मुलांचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कु. गौरवी चंद्रकांत मोहिते (वय 11) आणि चि. प्रतीक चंद्रकांत मोहिते (वय 7) असे दुर्दैवी मुलांचे नाव आहे.
शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित चंद्रकांत अशोक मोहिते (वय 37), मूळ कोयनानगर रासाटी, ता. पाटण,  सध्या रा. घाटकोपर, मुंबई हा चालक म्हणून काम करतो. मुंबई येथे पत्नी व दोन मुलांसह तो वास्तव्यास आहे. चंद्रकांत मोहिते याला टी. बी. झाल्यामुळे काही दिवसांपासून तो त्रस्त होता. त्यामुळे पती-पत्नी यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. चंद्रकांत मोहिते यास मला काही झाल्यास माझ्या माघारी पत्नी मुलांचा नीट सांभाळ करणार नाही, अशी भीती त्याला होती. त्यामुळे त्याने मुलगी गौरवी व मुलगा प्रतीक यांना दि. 8 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घाटकोपर येथील राहत्या घरातून स्विफ्ट कार (क्र. एम. एच. 1 बीटी 8722) मधून गावी देवदर्शनाला जातो असे सांगून घेऊन साताराकडे निघाला. दरम्यानच्या काळात त्याने आपल्या भावाला फोनवरून आपण दोन्ही मुलांना मारणार असल्याचे सांगितले. चंद्रकांतच्या भावाने तत्काळ याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. याची दखल घेत पोलिसांनी यंत्रणा हलवली. परंतु तोपर्यंत चंद्रकांत मोहिते शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे पोहचला होता. पहाटेची वेळ असल्यामुळे मुले गाडीतच झोपी गेली होती. आपण सकाळ पाहणार की नाही याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. गावी जाणार एवढेच त्यांच्या डोक्यात असणार. परंतु पुढे नियतीने काय वाढून ठेवले आहे हे या निष्पाप जीवांना काय माहीत असणार. गाडी रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर चंद्रकांतने गाडीमध्ये झोपेत असलेल्या कु. गौरवी आणि प्रतीक या दोघांचा गळा आवळला. त्यानंतर त्याने गाडी पुन्हा पुणे बाजूकडे वळवली. काही अंतरावर गेल्यावर राजगड पोलिसांनी चंद्रकांत मोहिते याला ताब्यात घेत शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली. शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हजारे तपास करत आहेत.
पोलिसांनी पाठलाग करून पकडले
दुर्धर आजाराने त्रस्त, त्यातच पत्नीशी नेहमी होणारे वाद यामुळे वैतागलेल्या चंद्रकांतने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पत्नीस दाखवायला मुंबईकडे निघाला असतानाच राजगड पोलिसांनी पाठलाग करत शिताफीने खेड-शिवापूर जवळ त्याला ताब्यात घेतले. खुनाची घटना सातारा जिल्ह्याच्या हद्दीत शिरवळ येथे घडल्यामुळे राजगड पोलिसांनी त्याला शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: