Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आता सर्वांचा हिशोब चुकता होणार : उदयसिंह
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: re2
5उंडाळे, दि.9 : गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी एकाच वेळी आपणाला दोन लढाया लढाव्या लागल्या. या दोन्ही लढाया महाराष्ट्राच्या सर्वंकष सत्तेविरुद्ध होत्या. त्यापैकी एक लढाई आपण जिंकलो. मात्र विधानसभेची लढाई हरावी लागली याचे शल्य सर्वांमध्ये असून ती वेळ तुमची होती. आता वेळ आमची आली आहे. आता हिशोब सर्वांचा होणार ही नुसती वल्गना नसून रयत संघटनेचा आत्मविश्‍वास असल्याचे प्रतिपादन रयत संघटनेचे विधानसभेचे अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांनी केले.
विंग, ता. कराड येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी हजारो जनसमुदायासमोर आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री विलासराव पाटील (काका), कराड पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार, कराडचे माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, मजहर कागदी, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग पाटील, पोपटराव जाधव, सर्जेराव लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयसिंह पाटील म्हणाले, नुसता दिखावा करणे आपले काम नव्हे. समाजात उतरून काम करण्याची पन्नास वर्षाची आपली परंपरा आहे. आपणाला नुसत्या घोषणा करून निवडणूक जिंकता येणार नाही.
त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. विकासाचा तुलनात्मक आलेख आपण लोकांसमोर मांडला पाहिजे. मतदारसंघात 80 पूर्वी काय अवस्था होती? 2014 पर्यंत विलासकाकांनी केलेला मतदारसंघाचा कायापालट आणि या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी केलेली कामे याचा लेखाजोखा लोकांच्या समोर कार्यकर्त्यांनी मांडला पाहिजे.
काहीजण म्हणतात यांचा अजेंडा काय? सामान्य माणसाचा विकास हाच आमचा अजेंडा. रयत संघटनेकडे असणारी मानाची आमदारकी पुन्हा संघटनेच्या ताब्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी आज तुमच्यापुढे उभा आहे. सुख काय असतं ते मी भोगले आहे. 2014 ला या जागेवर मी येऊ शकलो नव्हतो ही वेळ माझ्यावर होती असे म्हणत यावेळी ते भावूक झाले. आपल्याकडे कार्यकर्त्यांची मोठी संघटना आहे, ताकत आहे. त्याचे योग्य नियोजन करून प्रत्येकाने पुन्हा विधानसभा परत मिळवण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
विलासराव पाटील म्हणाले, मी व माझ्या कार्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे 35 वर्ष सुसंस्कृत विचारांनी कराड दक्षिण मतदारसंघ जोपासला होता. मात्र गत निवडणुकीत सत्तेच्या जोरावर माजी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील विचार-आचार संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे काम केले. या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असणार्‍या काँग्रेस पक्षाचे फक्त 42 आमदार निवडून आले. या दुरवस्थेला तेच जबाबदार असून पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले. आता संपूर्ण जिल्ह्याची काँग्रेस संपवायला निघालेत, अशी खरमरीत टीका त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात कधीच सुडाचे राजकारण केले नाही. पण माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची संस्कृती उध्वस्त करून टाकली. तेच आज आपणा विरोधात पुन्हा उभे आहेत तर दुसर्‍या उमेदवाराबाबत बोलायलाच नको. आमदार होण्यासाठी त्यांचे काय काय उद्योग सुरू आहेत ते सर्वश्रुत असल्याची टीका करत अतुल भोसले यांचे नाव न घेता उंडाळकर यांनी त्यांना फटकारले.
राजकारण, समाजकारण करताना मी जे जे केले ते जनतेसाठी केले. त्यामुळे मला मते मागण्याचा नैतिक अधिकार असून कार्यकर्त्यांनी सभेला असलेल्या या गर्दीमुळे भारावून न जाता मतपेटीद्वारे विरोधकांचा पराभव करण्याचे आवाहन केले.
यावेळी हनीफ मुल्ला, सौ. वैशाली जाधव, अशोकराव भोसले, मजहर कागदी, फरिदा इनामदार, धनाजीराव काटकर, वसंतराव जगदाळे यांनी मनोगते व्यक्त केली. विजयाताई माने यांनी प्रास्ताविक केले. भागवत कणसे यांनी आभार मानले. यावेळी कराड दक्षिण मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, महिला व युवक उपस्थित होते.
विरोट सभेचीच सर्वत्र चर्चा
सभेस सुमारे दहा हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता. कोणालाही गाडी, जेवण पैसे न देता स्वखर्चाने आलेल्या या जनसमुदायाने कराड दक्षिण मतदारसंघात सर्वत्र चर्चा या विराट सभेची होती. ही सभा कराड दक्षिणच्या राजकारण्यांना धडकीच भरणारी ठरली.
उदयसिंह पाटलांच्या उमेदवारीस सहकार्याची भूमिका
सभेस कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालकांसह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीस सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
चव्हाणांना कार्यकर्त्यांनी गल्लीचा दणका दाखवावा
सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मोठ्या मनाने सोडली असताना व काँग्रेस पक्षाने आदेश दिला असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी नाकारली. त्यांना दिल्ली नको आहे तर कार्यकर्त्यांनी गल्लीचा दणका दाखवावा. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमुक्त केल्यानंतर आता सातारा जिल्हाही काँग्रेसमुक्त केलाय. आता त्यांचा कराड दक्षिणेत पराभव करून आपणच काँग्रेसला पृथ्वीमुक्त करूया अशी टीका खटावचे कार्यकर्ते राजूभाई मुलांणी यांनी यावेळी केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: