Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अजिंक्यतारा शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबध्द : शिवेंद्रसिंहराजे
ऐक्य समूह
Friday, October 11, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: lo2
5 सातारा, दि. 10 : स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने चालू केलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक सक्षम सहकारी संस्था म्हणून ती ओळखली जात आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकिक आहे. शासनाने इथेनॉल निर्मितीबाबत घेतलेले धोरण सकारात्मक असून आपला कारखानाही इथेनॉल निर्मितीसाठी प्राधान्य देणार असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढणार आहे. पर्यायाने ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना चांगला दर देता येणार असून या गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबध्द राहील, अशी ग्वाही श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा 2019-20 या गळीत हंगामाचा 36 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत रूद्रनिलराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्‍वास शेडगे, विविध मान्यवर आणि संचालक उपस्थित होते.
गेल्या 10 ते 12 वर्षात अजिंक्यतारा कारखान्याने प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला असून सभासद, कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूक यंत्रणा या सर्वांचीच विश्‍वासार्हता वाढवली आहे. याचे कारण म्हणजे कारखाना पूर्ण क्षमतेने सक्षमतेने सुरु असून येणार्‍या उसाला वेळेत आणि एफआरपीप्रमाणे दर दिला जात आहे. कोणत्याही बाबतीत कारखाना मागे पडला नाही. त्यामुळेच राज्याच्या सहकारी कारखानदारी क्षेत्रात एक विश्‍वसनीय नाव म्हणून अजिंक्यतारा कारखान्याकडे पाहिले जात आहे. सभासद, शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणारी संस्था आणि संस्था अडचणीत असेल तर त्यासाठी जीवाचे रान करणारे सभासद आणि कामगार असे घट्ट नाते आपल्या कारखान्यात पहावयात मिळते. अनेक अडचणींवर मात करुन संस्था नावारुपास आली असून स्व. भाऊसाहेब महाराज यांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांची मोलाची साथ यामुळेच अजिंक्यतारा कारखान्याची घोडदौड जोमाने सुरु आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
या गळीत हंगामात 5 लक्ष मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असले तरी त्यापेक्षाही जास्त गाळप केले जाईल. कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करण्याचा मानस असून जास्त वेळ न लावता तीन ते चार महिन्यात गाळप संपवण्याचा प्रयत्न केला जाणर आहे. नवीन मशिनरीमुळे रिकव्हरीमध्ये निश्‍चितपणे वाढ होणार आहे. आपल्या कारखान्याची गाळप क्षमता आगामी काळात निश्‍चितपणे वाढवली जाणार असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रातील बाहेरच्या कारखान्यांना काही प्रमाणात जाणारा ऊस आपल्या कारखान्यात गाळपास येईल. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंद केलेला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याला गाळपासाठी द्यावा आणि हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
ज्येष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. व्हाईस चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
कार्यक्रमास कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, सदस्या सौ. कमल जाधव, प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, चंद्रकांत जाधव, पं. स. सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, रवींद्र कदम, धर्मराज घोरपडे, नारायण कणसे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, गणपतराव शिंदे, किरण साबळे, सतीश चव्हाण, अ‍ॅड. सूर्यकांत धनावडे, सूत गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, रामचंद्र जगताप, पंडितराव सावंत, अरविंद चव्हाण, दादा शेळके, तात्या वाघमळे, बळासाहेब लोहार, कामगार युनियचे अध्यक्ष धनवे, सरचिटणीस सयाजी कदम यांच्यासह अजिंक्य उद्योग समूहाचे आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बिगर सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: