Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 214
5मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) : देशातील मध्यमवर्गीय आणि गरीब जनता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर निवडून देण्यासाठी उत्सुक होती. देशात मोदींची सुप्त लाट जाणवते आहे, तिचे त्सुनामीत रूपांतर होणार असल्याचे मी नेहमीच सांगत होतो. आज तेच प्रत्यक्षात उतरले आहे. देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. युतीत मागच्या काळात झालेला कलह दुर्दैवी होता. मात्र, आता मळभ दूर झाले असून आगामी विधानसभा व त्यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्याने युतीत जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह व मित्र पक्षांचे अभिनंदन केले. मोदींबद्दल देशातील जनतेला प्रचंड विश्‍वास होता. महाराष्ट्रात दुष्काळ होता. इतरही समस्या होत्या पण राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या कामगिरीवर जनता खूष होती.
Friday, May 24, 2019 AT 08:33 PM (IST)
5मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत देशभरात घोडदौड करणार्‍या भाजपने शिवसेनेच्या साथीने महाराष्ट्रातही मोठे यश मिळवले आहे. राज्यातील 48 पैकी 41 जागांवर युतीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे झालेल्या मतविभागणीचा तब्बल 13 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीला तडाखा बसला. युतीने 2014 च्या निवडणुकीतील यश कायम राखले असले तरी केंद्रीय मंत्री अनंत गीते व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, मोदी त्सुनामीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात एमआयएमने खाते उघडले असून इम्तियाज जलील यांनी शिवसेना खा. चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबादमध्ये साडेपाच हजार मतांनी पराभव केला.
Friday, May 24, 2019 AT 08:26 PM (IST)
‘मोदी इज बॅक’, त्सुनामीत विरोधकांचा सफाया 5नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : 2014 साली मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाची पुनरावृत्ती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित रालोआने मागील निवडणुकीपेक्षाही मोठे यश मिळवून तब्बल साडेतीनशे जागा पटकावल्या आहेत. 2014 साली देशात मोदी लाट होती तर यंदा या लाटेचे रूपांतर त्सुनामीत झाले. या त्सुनामीत काँग्रेससह विरोधी पक्षांचे आव्हान पालापाचोळ्यासारखे उडून गेले. लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी निवडणूक झाली. वेल्लूर येथील एका जागेची निवडणूक आयोगाने रद्द केली होती. मतदान झालेल्या जागांपैकी जवळपास तीनशे जागांवर भाजपने स्वबळावर मुसंडी मारली आणि मित्रपक्षांच्या साथीत प्रचंड बहुमताने देशाची सत्ता पुन्हा काबीज केली आहे. भाजपच्या या यशामुळे राजकीय पंडित थक्क झाले आहेत. मात्र, काही वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी केलेले एक्झिट पोल जवळपास योग्य ठरले आहेत. या निवडणुकीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी राफेल करारातील कथित भ्रष्टाचारावरून उठवलेले वादळ, मोदींवर केलेली व्यक्तिगत टीका विरोधकांना फलद्रुप झाली नाही.
Friday, May 24, 2019 AT 08:24 PM (IST)
5पॅरिस, दि. 22 (वृत्तसंस्था) : फ्रान्समध्ये भारतीय हवाई दल- राफेल प्रकल्प व्यवस्थापनाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी केल्याचे समोर आले आहे. भारताने 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हवाई दलासाठी राफेल विमानांच्या शस्त्रसज्जतेत महत्त्वाचे आणि आवश्यक बदल करण्यात येत आहेत. हे काम पाहण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी हवाई दलाचे पथक पॅरिसमध्ये आहे. त्या संदर्भातील दस्तऐवज चोरण्याचा उद्देश त्यामागे असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरात राफेल प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार्‍या पथकाचे कार्यालय असून कार्यालयातून हार्ड डिस्क किंवा कोणताही दस्तऐवज चोरीला गेलेला नाही, अशी माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली. अज्ञात व्यक्तींचा कार्यालयात घुसण्याचा नेमका उद्देश कोणता होता, याचा तपास सुरू आहे. ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली राफेल प्रकल्प व्यवस्थापन पथक कार्यरत आहे. 36 राफेल विमानांमध्ये भारतीय हवाई दलाला अनुकूल आणि आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
Thursday, May 23, 2019 AT 08:46 PM (IST)
आज मतमोजणी यंत्रणा सज्ज एक्झिट पोल खरे ठरणार का? 5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास दीड-दोन महिने प्रचाराची रणधुमाळी झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा उद्या (दि. 23) 542 जागांसाठी होणार्‍या मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. आता भाजपप्रणित रालोआचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सत्ता राखणार, की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचून घेणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमुळे यावेळी अंतिम निकालांना चार ते पाच तास उशीर होईल, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. दरम्यान,शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर आले. या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला 302 ते 336 जागा मिळून सरकार पुन्हा सत्तेवर येणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा नारा खरा ठरेल, असा भाजपला विश्‍वास आहे. मात्र, हे एक्झिट पोल चुकीचे ठरतील, असा दावा करत त्यांचे निष्कर्ष विरोधी पक्षांनी फेटाळले आहेत. त्यामुळे निकालाकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
Thursday, May 23, 2019 AT 08:34 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: