Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 126
केंद्रीय निवडणूक आयोगाचा विरोधकांना झटका 5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी सुरू करण्यापूर्वी  ‘व्हीव्हीपॅट’ मशीनमधील मतपावत्यांची पडताळणी करावी आणि त्यात तफावत आढळल्यास लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या संबंधित विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटमधील मतपावत्या पडताळून पहाव्यात, ही विरोधकांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची पडताळणी पूर्वीप्रमाणे मतमोजणीच्या शेवटीच करण्यात येईल, असे स्पष्ट करत आयोगाने विरोधकांना झटका दिला आहे. विरोधकांनी काल निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ईव्हीएम संदर्भातील आपल्या शंका त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्याचबरोबर एक निवेदन देऊन व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची मतमोजणी सुरू करण्यापूर्वी पडताळणी करावी, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर एखाद्या व्हीव्हीपॅटमधील मतपावत्या आणि त्याला जोडलेल्या ईव्हीएममधील मतदान यात तफावत आढळल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली होती. त्यावर आज बैठक घेऊन  आयोगाने विरोधकांची मागणी फेटाळून लावली.
Thursday, May 23, 2019 AT 08:43 PM (IST)
मोदी-शहांची ‘डिनर डिप्लोमसी’ 5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : एक्झिट पोलचे निष्कर्ष मनासारखे आल्याने उत्साह संचारलेल्या रालोआतील नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री शाही भोजन दिले. दिल्लीतील पंचतारांकित अशोका हॉटेलमध्ये मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांचा भाजपने अगत्याने पाहुणचार केला. ‘फिर एक बार मोदी सरकार’ येणार असल्याचे निष्कर्ष एक्झिट पोलने वर्तविल्याने रालोआच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला असून सर्वच नेत्यांच्या चेहेर्‍यावर त्याची झाक स्पष्ट दिसत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बसण्याची व्यवस्था अमित शहा यांच्या शेजारी करण्यात आली होती. सर्वच ‘एक्झिट पोल’नुसार रालोआचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मतमोजणीच्या दोन दिवस आधी सर्व मित्रपक्षांना भाजपने स्नेहभोजन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होतेच, त्याचबरोबर सर्व नेत्यांचे आदरातिथ्य करत होते. 23 मे ला काय निकाल लागतील, याची धाकधूक असली तरी काय होणार, याची दिशा सर्वांनाच कळाली आहे.
Wednesday, May 22, 2019 AT 08:48 PM (IST)
5इटानगर, दि. 21 (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यात नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार तिरोंग अबो (41) यांच्यासह दहा जणांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अबो यांचा वाहनांचा ताफा आज सकाळी 11.30 च्या सुमारास जात असताना बोगापानी गावाजवळ गाड्या अडवून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात अबो, त्यांचा मुलगा आणि सुरक्षारक्षक असे एकूण दहा जण ठार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले. तिरोंग अबो हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा एकदा खोनसा पश्‍चिम मतदारसंघातून एनपीपीकडून नशीब आजमावत होते. अरुणाचलमध्ये लोकसभेसोबत विधानसभेचेही मतदान झाले असून निकालाआधीच अबो यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अबो हे मतदारसंघात परतत होते. त्यांच्यासोबत कुटुंबीय, पोलिंग एजंट व तीन पोलीस होते. या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना दिब्रुगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Wednesday, May 22, 2019 AT 08:33 PM (IST)
भयगंडाने पछाडलेल्या विरोधकांची मागणी 5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : एक्झिट पोलमधील निष्कर्षांमुळे लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या भयगंडाने पछाडलेल्या काँग्रेस, सप, बसप, तृणमूलसह 22 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. लोकसभा मतदारसंघांतर्गत एखाद्या विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या पाच ‘व्हीव्हीपॅट’मधील मतपावत्यांच्या पडताळणीत ईव्हीएममधील मतांशी तफावत आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील शंभर टक्के व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी या नेत्यांनी केली. मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मतमोजणी सुरू करण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने निवडलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची पडताळणी करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. त्यावर निवडणूक आयोग उद्या (बुधवार) बैठक घेणार असल्याचे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. दरम्यान, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित असल्याचे सांगताना ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचे विरोधी पक्षांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले.
Wednesday, May 22, 2019 AT 08:32 PM (IST)
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार? 5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातले मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलचा दर लीटरमागे 16 पैशांनी वधारला आहे. देशाच्या राजधानीतही इंधन दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर घसरत होते. मात्र काल शेवटच्या टप्प्यातले मतदान संपताच आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल, डिझेल दरात झालेली वाढ नियमित स्वरूपाची असून त्यात काहीच चुकीचे नसल्याचे सरकारी इंधन  कंपन्यांनी सांगितले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात सरकारने कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसात इंधन कंपन्यांनी फारशी वाढ केलेली नव्हती. या काळात झालेले नुकसान आता भरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. जागतिक इंधन बाजारातील स्थिती सध्या फारशी चांगली नाही.
Tuesday, May 21, 2019 AT 09:05 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: