Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 31
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘म्होरक्या’चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली. कर्करोगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. ते 38 वर्षांचे होते. कल्याण पडाल यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याण यांना आतड्याचा कर्करोग झाला होता. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पडाल यांना काविळही झाली होती. या आजारपणाला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य संपवले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण पडाल यांच्या ‘म्होरक्या’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या चित्रपटाची मोठी उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या या चित्रपटाची तारीख पडाल यांच्या आत्महत्येमुळे पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Monday, May 21, 2018 AT 08:59 PM (IST)
5औरंगाबाद, दि. 20 (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात कपडे धुण्यासाठी खदानीत गेलेल्या सहा मुलींपैकी तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे घनसावंगीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथे लघुसिंचन तलावावर या 15 ते 17 वयोगटातील सहाही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणी धुतल्यानंतर या मुलींनी तलावात पोहायला सुरुवात केली. मात्र तलावात खदानी असल्याने खदानीतील गाळात त्या फसल्या. त्यामुळे त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आक्रोश ऐकून काही मुलांनी त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न केला.    त्यातील तीन मुलींना वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र इतर तीन मुलींना ते वाचवू शकले नाहीत. सोमित्रा दत्ता सातपुते, संगीता बजरंग रणमाळे आणि जनाबाई रणमाळे अशी या मृत मुलींची नावे आहेत. तर कल्याणी खोसे, मनीषा रणमाळे आणि ज्योती हेमके अशी वाचवण्यात आलेल्या मुलींची नावे आहेत. मात्र या घटनेमुळे घनसावंगी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.
Monday, May 21, 2018 AT 08:43 PM (IST)
कट कारस्थानाचा संशय पंतप्रधानांकडून विचारपूस 5बंगलोर, दि. 27 (वृत्तसंस्था) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटक दौर्‍यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात गुरुवारी तांत्रिक बिघाड झाला. विमान हवेत असताना हेलकावे खात होते आणि विमानतळावर उतरताना ते एका बाजूला कलले होते. विमान तिसर्‍या प्रयत्नात विमानतळावर उतरवण्यात यश आले, अशी तक्रार राहुल गांधींच्या निकटवर्तीयाने पोलिसांकडे केली आहे. यामागे कटकारस्थान असल्याचा संशय या तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, चीनच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. राहुल गांधी हे ‘डेसॉल्ट फाल्कन 2000’ या 10 आसनी विमानाने गुरुवारी सकाळी नवी दिल्लीहून कर्नाटकातील हुबळीला जात होते. विमानाने 9.20 वाजता दिल्लीतून उड्डाण केले. हे विमान हुबळी येथे 11.20 वाजता लँडिंग करत असताना धावपट्टीवरून उतरले. विमान अचानक उजव्या बाजूला झुकले आणि झटके बसू लागले. प्रवासादरम्यानही हवेत विमानाला झटके बसत होते. विमान सारखे हेलकावे खात होते आणि इंजिनामधून  मोठा आवाज येत होता.
Saturday, April 28, 2018 AT 08:58 PM (IST)
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकही जाहीर 28 मे रोजी मतदान, 31 ला मतमोजणी 5मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) : राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन लोकसभा मतदारसंघाची आणि माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. या पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान आणि 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पूर्वी भाजपकडे असलेल्या लोकसभेच्या दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती तर भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी पक्ष सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली होती. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली होती. या तिन्ही जागांसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. 3 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 10 मे ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल.
Friday, April 27, 2018 AT 08:37 PM (IST)
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील दुर्घटना 5गोरखपूर, दि. 26 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेगाडीने स्कूल व्हॅनला दिलेल्या जोरदार धडकेत व्हॅनचालक आणि 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातस्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिवन ते गोरखपूर जाणार्‍या रेल्वेने मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगवर या स्कूल व्हॅनला धडक दिली. या व्हॅनमधून 20 विद्यार्थी प्रवास करत होते. सकाळी शाळेत जाण्यासाठी  ते निघाले होते. विष्णुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाहपुरा येथील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. स्कूल व्हॅनचा चालक कानात इअरफोन लावून गाडी चालवत होता. तो मोबाईलमधील गाणी ऐकत असावा, असा संशय व्यक्त होत आहे. मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करताना रेल्वे येत असल्याची खात्री व्हॅनचालकाने केली नसल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Friday, April 27, 2018 AT 08:34 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: