Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 67
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर दररोज इंधनाचे दर वाढत असल्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महानगरांमध्ये गुरुवारी 11 ते 14 पैशांची कपात झाली. वेगवेगळ्या शहरांमध्ये ही दरकपात वेगवेगळी आहे. मुंबईत पेट्रोल 11 पैसे तर चेन्नईत 12 पैशांनी स्वस्त झाले. 14 ते 29 मे या दरम्यान पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती. गुरुवारी डिझेलच्या दरातही 10 ते 14 पैशांची कपात झाली आहे. दिल्ली, कोलकाता व चेन्नईत 10 पैशांची तर मुंबईत 14 पैशांची कपात झाली. गेल्या 21 दिवसांमध्ये पेट्रोल एकूण 1 रुपया 53 पैशांनी तर डिझेल एकूण 1 रुपया 52 पैशांनी स्वस्त झाले आहे.
Friday, June 22, 2018 AT 08:43 PM (IST)
दहशतवाद्यांचा नि:पात करण्याचे आदेश 5श्रीनगर, दि. 20 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानंतर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनेही सरकार स्थापन करण्यास नकार दिल्याने राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल एम. एन. व्होरा यांनी केलेल्या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली. दरम्यान, राज्यपाल राजवटीमुळे दहशतवाद्यांविरुद्धच्या लष्करी कारवायांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केले आहे तर राज्यात आता कोणताही राजकीय दबाव नसल्याने दहशतवाद्यांचा पूर्णपणे बीमोड करा, अशी सूचना राज्यपाल व्होरा यांनी लष्कराला केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2015 साली झालेल्या निवडणुकीनंतर पीडीपी-भाजपने आघाडी करून सरकार स्थापन केले होते. मात्र, रमजानच्या महिन्यातील एकतर्फी शस्त्रसंधीनंतर भाजपने मंगळवारी सरकारमधून माघार घेतल्याने मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
Thursday, June 21, 2018 AT 08:30 PM (IST)
महागाई भडकणार 5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी सोमवारपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील 60 टक्के ट्रकचालक सहभागी झाले आहेत. संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारचं इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्याने इंधन दरवाढ करण्यात आल्याचे कारण सरकार देत आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या करांमुळे ही दरवाढ झाल्याचे आमचे मत आहे, असे ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी सांगितले. आजच्या संपात 90 लाख ट्रक चालक उतरणार असल्याचेही ते म्हणाले. पश्‍चिम बंगालमध्ये 3.5 लाख ट्रक चालक संपात सहभागी झाल्याचा दावा बंगाल ट्रक ऑपरेटर असोसिएशनचे संयुक्त सचिव सजल घोष यांनी केला. केंद्र सरकार एक लिटर इंधनामागे आठ रुपये अधिभार आकारते. राज्याकडूनही 10.30 रुपये अधिभार आकारला जातो. एक कि.मी. रस्त्यासाठी सरकार आठ रुपये कर घेते. थर्ड पार्टी विमादरातील वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे.
Tuesday, June 19, 2018 AT 08:29 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : आम आदमी पक्षाच्यावतीने आज (रविवार) मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान हा मोर्चा पोलिसांनी संसद मार्गावरच रोखून धरला. दिल्ली येथे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात तीव्र संघर्ष झाला आहे. त्याचा परिणाम आज आम आदमी पक्षाने नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधानांच निशाण्यावर घेण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. परंतु हा मोर्चा संसद मार्गावर रोखण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी आपच्यावतीने हो मोर्चा काढण्यात आला. मोर्चात खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अरविंद केजरीवाल गेल्या आठवड्यापासून एलजी हाऊसमध्ये धरणे धरून आहेत. दिल्लीतील अधिकारी संपावर असून यामुळे सरकारच्या कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. परंतु, दिल्लीतील आयएएस संघटनेने पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. सर्व विभागातील अधिकारी कामावर असल्याचा दावा केला आहे.
Monday, June 18, 2018 AT 08:49 PM (IST)
सीमेवर दोन दहशतवाद्यांचा खात्मा 5श्रीनगर, दि. 14 (वृत्तसंस्था) : रमजान ईदसाठी सुट्टीवर असलेल्या औरंगजेब या लष्करी जवानाचे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी अपहरण केले असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, बांदीपोरा जिल्ह्यातील पनार जंगलात गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांशी लढताना एका जवानाला वीरमरण आले. पूँछ येथे राहणार्‍या औरंगजेब या लष्करी जवानाचे दहशतवाद्यांनी गुरुवारी पुलवामामधून अपहरण केले. तो 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात तैनात होता. कुख्यात दहशतवादी समीर टायगरला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार मारले होते. त्या चकमकीत औरंगजेब सहभागी होता. औरंगजेब याचा शोध घेण्यात येत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. तो पूँछ येथे राहणारा असून त्याने रमजान ईदसाठी सुट्टी घेतली होती. तो गाडीने घरी परतत असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. मागच्या वर्षी मे महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये उमर फय्याझ या निशस्त्र लष्करी अधिकार्‍याचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती.
Friday, June 15, 2018 AT 08:34 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: